kissing health risks
मुंबई: प्रेमात व्यक्ती सर्व काही विसरून जाते असे म्हटले जाते, मात्र एका नवीन संशोधनानंतर तज्ज्ञांनी प्रेमी युगुलांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. प्रेमात सर्व काही विसरलात तरी चालेल, पण आपल्या जोडीदाराला 'किस' करण्यापूर्वी अर्धा ग्लास पाणी प्यायला विसरू नका, असे संशोधनात म्हटलं आहे. तुमच्या प्रेमात खोडा घालण्याचा हा उद्देश नाही; उलट, पाणी प्याला नाही तर आरोग्याला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता असते, असे समोर आले आहे.
कोलंबिया विद्यापीठात अलीकडील एका संशोधनात 'सिलियाक' या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींवर 'किस'चा काय परिणाम होतो, याचा अभ्यास करण्यात आला. सिलियाक हा असा आजार आहे ज्यामध्ये रुग्णाला 'ग्लूटेन'युक्त (गहू, बार्ली इ.) पदार्थांची ॲलर्जी असते. ग्लूटेनचे सेवन केल्यास त्यांच्या लहान आतड्याला गंभीर इजा होऊ शकते.
या अभ्यासात असे दिसून आले की, जर एका पार्टनरने गव्हाचे पदार्थ खाल्ले असतील आणि त्यानंतर जोडीदाराला किस केले, तर लाळेद्वारे ग्लूटेनचे कण दुसऱ्याच्या शरीरात जाऊ शकतात. काही प्रकरणांमध्ये हे प्रमाण धोक्याच्या पातळीच्या पलीकडे असल्याचे आढळले. मात्र, किस करण्यापूर्वी अर्धा ग्लास पाणी प्यायल्यास ग्लूटेनचा होणारा हा प्रसार जवळपास शून्यावर येतो, असे संशोधनात सिद्ध झाले आहे.
अमेरिकेतील प्रसिद्ध 'मायो क्लिनिक'ने केलेल्या दुसऱ्या एका संशोधनात 'एपस्टिन-बार' नावाच्या विषाणूचा अभ्यास केला. हा विषाणू लाळेद्वारे पसरतो, म्हणून याला सामान्य भाषेत 'किसिंग डिसीज' असेही म्हणतात. या व्हायरसचा संसर्ग झाल्यास तीव्र ताप आणि घसा दुखी, सतत थकवा आणि मानेवर सूज येणे, अशी लक्षणे दिसू शकतात. धक्कादायक बाब म्हणजे, हा विषाणू शरीरात सुप्त अवस्थेत राहू शकतो आणि भविष्यात 'मल्टिपल स्क्लेरोसिस' सारख्या गंभीर आजाराला कारणीभूत ठरू शकतो. हा एक असा आजार आहे ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्तीच मज्जासंस्थेवर हल्ला करते.
दोन्ही संशोधनातून समोर आले आहे की, लाळ हे अनेक आजारांच्या प्रसाराचे माध्यम ठरू शकते. लाळेद्वारे पसरणारे ग्लूटेन पचनसंस्थेवर परिणाम करते, तर विषाणू भविष्यात गंभीर आजार ओढवू शकतो. तज्ज्ञांच्या मते, घाबरून जाण्याचे कारण नाही, मात्र थोडी खबरदारी घेणे गरजेचे आहे. जर जोडीदाराला कोणताही व्हायरल इन्फेक्शन असेल, तर अशा काळात शारीरिक जवळीक टाळणे उत्तम. तसेच, सुरक्षिततेचा एक सोपा नियम म्हणून किस करण्यापूर्वी पाणी पिण्याची सवय लावणे आरोग्यासाठी हिताचे ठरेल.