Khan Sir coaching firing
पटणा: बिहारची राजधानी पटणा येथे प्रसिद्ध शिक्षक खान सर यांच्या कोचिंग इन्स्टिट्यूटबाहेर बाहेर मंगळवारी (दि. २) झालेल्या गोळीबार आणि दगडफेकीच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. दोन कोचिंग सेंटरमधील विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादाने हिंसक वळण घेतले आहे. खान सरांचे कोचिंग सेंटर पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात आले असून घटनेच्या निषेधार्थ सकाळपासून विद्यार्थ्यांनी रस्त्यावर धरणे आंदोलन सुरू केले आहे.
मुसल्लहपूर हाट परिसरातील खान क्लासेस आणि ज्ञान बिंदू कोचिंग संस्थांच्या विद्यार्थ्यांमध्ये सुरुवातीला वाद झाला. हा वाद इतका वाढला की दोन्ही बाजूंच्या विद्यार्थ्यांसह काही समाजकंटकांनी एकमेकांवर दगडफेक सुरू केली. याचदरम्यान गोळीबार झाल्याचेही सांगितले जात आहे. यादरम्यान खान क्लासेसच्या एका सुरक्षा रक्षकाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अचानक उसळलेल्या हिंसाचारामुळे परिसरात मोठी धावपळ उडाली होती. स्थानिक दुकानदार आणि नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. घटनेनंतर पटण्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक, पोलीस अधीक्षक आणि पोलीस पथके घटनास्थळी दाखल झाली. दोन्ही कोचिंग संस्थांमध्ये गेल्या काही काळापासून स्पर्धा आणि तणाव असल्याची माहिती समोर आली आहे. कदमकुआं पोलीस ठाण्याचे प्रभारी जन्मजय कुमार यांनी सांगितले की, खान क्लासेसच्या तक्रारीनुसार दुसऱ्या गटाने गोळीबार केला. मात्र, ज्ञान बिंदू कोचिंगच्या बाजूनेही खान क्लासेसशी संबंधित व्यक्तींवर गोळीबाराचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या दाव्यांची पडताळणी सुरू आहे.
खान सरांचे कोचिंग सेंटर सध्या पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. कोचिंग सेंटरबाहेर घडलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर आणि त्यानंतर निर्माण झालेल्या गोंधळानंतर, विद्यार्थ्यांनी आता निषेधार्थ रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे. आज सकाळी, शेकडो विद्यार्थी खान सरांच्या निवासस्थानाबाहेर जमले आणि त्यांनी रस्त्यावरच धरणे आंदोलन केले. विद्यार्थ्यांचे हे आंदोलन सुरू असताना, त्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनादरम्यान, खान सर आपल्या घराच्या बाल्कनीत आले आणि त्यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक विशेष आवाहन केले. हात जोडून, खान सरांनी आंदोलनकर्त्यांना वारंवार आपल्या घरी परत जाण्याची विनंती केली. तथापि, खान सरांनी केलेल्या या आर्त आवाहनानंतरही, आंदोलन करणारे विद्यार्थी घटनास्थळी ठामपणे ठाण मांडून बसले होते.
घटनेनंतर खान सर यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. “आम्ही कमी शुल्कात शिक्षण का देतो आणि आमच्या विद्यार्थ्यांना चांगले निकाल का मिळतात, यावरून काही लोक नाराज होते,” असे ते म्हणाले. गरीब विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळण्याचा अधिकार असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याची मागणी केली. चांगले निकाल मिळाल्यामुळे काही समाजविघातक घटकांना धोका वाटत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
खान सर यांनी दावा केला की, हल्लेखोरांनी त्यांच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली आणि गोळीबारही केला. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले असून सुरक्षा रक्षकाने काही संशयितांची ओळख पटवल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जवळच्या एका कोचिंग सेंटरशी संबंधित व्यक्तींनी कोचिंग सेंटर उडवून देण्याची धमकी दिल्याचाही आरोप त्यांनी केला.
पोलीस सध्या घटनास्थळ आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत आहेत. दगडफेक आणि हिंसाचारात सहभागी झालेल्या व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.