Khan Sir Coaching Controversy : बिहारची राजधानी पटना येथील प्रसिद्ध शिक्षक खान सर यांच्या कोचिंग इन्स्टिट्यूटबाहेर झालेल्या गोळीबार आणि दगडफेकीच्या घटनेतील संशयित आरोपी, ज्ञानबिंदू कोचिंग'चे (Gyan Bindu Coaching) संचालक रौशन आनंद यांचे भाऊ प्रिन्स यादव यांचा मृत्यू झाला आहे. नेपाळमधील एका हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. २ जून रोजी झालेल्या कोचिंग वादानंतर खान सरांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या FIR मध्ये प्रिन्स यांचेही नाव संशयित आरोपी म्हणून होते.
रौशन आनंद यांचे भाऊ प्रिन्स यादव हे नेपाळमधील एका हॉटेलमध्ये थांबले होते. मात्र, रविवारी सकाळी अचानक प्रिन्स यादव यांच्या मृत्यूची बातमी समोर आली. प्रिन्स यादव यांचा मृत्यू ब्रेन हॅमरेजमुळे (Brain Hemorrhage) झाल्याचे सांगण्यात येत आहे. खान सरांच्या कोचिंग सेंटरशी संबंधित वादात प्रिन्स यादव हे देखील आरोपी होते.
रौशन आनंद सरांच्या भावाच्या मृत्यूनंतर त्यांच्यासोबत हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या सर्व तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे. पोलीस सध्या या तरुणांची चौकशी करत आहेत. नेपाळ पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून प्रिन्स यादव यांच्या मृत्यूच्या पुष्टीनंतर त्यांचा मृतदेह भारतात आणला जात आहे.
मंगळवारी २ जून रोजी रात्री १५ ते २० लोकांच्या एका अज्ञात समुहाने पटनामधील खान सरांच्या कोचिंग क्लास खान ग्लोबल स्टडीज इंस्टिट्यूटवर हल्ला केला होता. हल्लेखोरांनी क्लासमध्ये जबरदस्त तोडफोड केली होती. तसेच दगडफेक देखील झाली. यानंतर सोशल मीडियावर एका व्हिडिओ व्हायरल झाला त्यात कोचिंग क्लासच्या दोन गाईसनी हवेत गोळीबार केल्याचं दिसून येत होतं. या प्रकरणी पोलिसांनी गुरूवारी दोन्ही गाईसना ताब्यात घेतलं होतं.
या घटनेनंतर पटनामधील कोचिंग सेंटरमधील स्पर्धा अजून तीव्र झाली आहे. खान सरांनी सुरूवातीला क्लासमधील तोडफोड आणि गोळीबार हा प्रतिस्पर्धी कोचिंग क्लासच्या लोकांनी केल्याचा आरोप केला होता. त्यावर प्रतिस्पर्धी ज्ञानबिंदू कोचिंग'चे संचालक रौशन आनंद यांनी पत्रकार परिषदेत खान सरांनी प्रसिद्धीसाठी किंवा इतर कराणांसाठी ही घटना घडवून आणली असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला होता.