Accident
केरळ : केरळमधील पठाणमथिट्टा जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने एका तरुणीला आणि तिच्या कुटुंबाला इम्प्रेस करण्यासाठी चक्क अपघाताचा बनाव रचला. या तरुणाने आपल्या मित्राच्या मदतीने या संपूर्ण घटनेचा कट रचला होता, मात्र पोलीस तपासात सत्य बाहेर आले आणि दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपीची ओळख रणजीत म्हणून झाली आहे, तर त्याच्या साथीदाराचे नाव अजास आहे. दोघेही कोन्नी, पठाणमथिट्टा येथील रहिवासी आहेत. ही घटना २३ डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. तरुणी अडूर येथील कोचिंग क्लास संपवून स्कूटरने घरी परतत होती. याच दरम्यान एका कारने काही अंतरापर्यंत तिचा पाठलाग केला आणि नंतर मुद्दाम तिच्या स्कूटरला धडक दिली.
कार चालवणारा अजास अपघातानंतर लगेचच घटनास्थळावरून पळून गेला. काही क्षणांनंतर रणजीत दुसऱ्या कारने तिथे पोहोचला आणि जखमी तरुणीला वाचवण्याचे नाटक करू लागला. आपण तरुणीचे पती आहोत असे सांगून त्याने स्थानिक लोकांचा विश्वास संपादन केला. याच बहाण्याने तो तिला उपचारासाठी तिरुवल्ला येथील रुग्णालयात घेऊन गेला.
सुरुवातीला तरुणीला आणि तिच्या कुटुंबाला रणजीतच्या 'शौर्यावर' कोणताही संशय आला नाही. मात्र, काही दिवसांनंतर रणजीत अपघाताच्या वेळी अगदी अचूक वेळी तिथे कसा काय उपस्थित होता, याबद्दल तरुणीला संशय आला. तिने याबद्दल पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आणि घटनास्थळाच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तसेच रणजीतचे कॉल डिटेल्स तपासले. तपासात हे स्पष्ट झाले की, हा अपघात पूर्णपणे पूर्वनियोजित होता आणि तरुणीच्या पालकांची सहानुभूती व विश्वास मिळवणे हा त्यामागचा उद्देश होता. चौकशी दरम्यान दोन्ही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले, तिथून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.