

kolkata who is pamela goswami bjp leader in kolkata against west bengal cm mamata banerjee
कोलकाता : पुढारी ऑनलाईन
पामेला गोस्वामी या पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आहेत. त्या बंगालमध्ये भाजपाच्या राज्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. पामेला गोस्वामी यांनी 2019 मध्ये भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. 2020 मध्ये त्यांची भाजपाच्या युवा संघटना भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM) च्या राज्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीस आता साधारण दोन महिने उरले आहेत. यावेळी बंगालमधील निवडणूक भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस (TMC) अशी थेट लढत ठरत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सत्तेतून बाहेर काढण्यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे टीएमसी कोणत्याही परिस्थितीत बंगालमध्ये भाजपची सत्ता येऊ न देण्यासाठी सज्ज आहे. अशा परिस्थितीत बंगालमध्ये एक नवे नाव वेगाने चर्चेत आले आहे, ते म्हणजे पामेला गोस्वामी. भाजपासाठी बंगालमध्ये जमीन तयार करण्याचे काम पामेला गोस्वामी करत असल्याचे म्हटले जात आहे.
असेही सांगितले जात आहे की,भाजप ममता बॅनर्जी यांच्या विरोधात एक मजबूत महिला आघाडी उभी करत आहे आणि त्या महिला आघाडीतील प्रमुख नाव म्हणजे पामेला गोस्वामी. 2021 मध्ये पामेला गोस्वामी अचानक चर्चेत आल्या होत्या, जेव्हा बंगाल पोलिसांनी त्यांना कोकेनसह अटक केली होती. त्यांच्यावर ड्रग्स तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र हे आरोप राजकीय हेतूने लावण्यात आल्याचे सांगितले गेले. टीएमसीकडून भाजपाला अडकवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली, असा दावा करण्यात आला होता. नंतर पामेला गोस्वामी यांची सर्व ड्रग्स प्रकरणातील आरोपांतून निर्दोष मुक्तता करण्यात आली.
सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या पामेला गोस्वामी या भाजपाच्या युवा नेत्या आहेत. त्यांनी 2019 मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला होता. तत्कालीन बंगाल भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांनी त्यांना भाजपात सामील करून घेतले होते. भाजपात येण्याआधीच पामेला गोस्वामी या जमीनीवर काम करणाऱ्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या. त्या युवा मतदारांना आकर्षित करण्याचे काम करत होत्या. त्यांची भाजपाच्या हुगळी जिल्ह्याच्या पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि त्या भाजप बंगालच्या महासचिवही होत्या.
पामेला गोस्वामी यांचा जन्म 14 मे 1993 रोजी पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कौशिक गोस्वामी तर आईचे नाव मधुचंदा गोस्वामी आहे. त्यांना पुमेल नावाची एक बहीण आहे. पामेला यांचे प्राथमिक शिक्षण कोलकात्यातील नामांकित शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी द हेरिटेज अकॅडमी, कोलकाता येथून शिक्षण पूर्ण केले. त्यांनी एमबीएचे शिक्षण घेतले आहे. त्यांना बंगाली, हिंदी आणि इंग्रजी भाषा अवगत आहेत.
पामेला गोस्वामी यांनी आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. मॉडेलिंगदरम्यान त्या एअर होस्टेस झाल्या आणि इंडिगो एअरलाइन्समध्ये कार्यरत होत्या. त्या इंडिगोमध्ये सीनियर केबिन क्रू म्हणून काम करत होत्या. याच काळात त्यांना चित्रपटसृष्टीत काम करण्याची संधी मिळाली आणि त्या बंगाली टीव्ही मालिका व चित्रपटांमध्ये झळकू लागल्या. 2010 मध्ये ‘मोन चाय टोम’ या बंगाली चित्रपटातून त्यांनी अभिनयात पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमध्ये काम केले. 2016 मध्ये प्रदर्शित झालेला ‘संपर्क’ हा त्यांचा चित्रपट चांगलाच गाजला होता.
चित्रपटसृष्टीत काम करत असतानाच पामेला गोस्वामी यांनी प्रोबीर डे यांच्यासोबत इंटीरियर डिझायनिंगचा व्यवसायही सुरू केला. त्यांनी ‘प्रोबीर एंजेलिना मर्केंटाइल प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी स्थापन केली आणि त्या तिच्या संचालक बनल्या. त्यांनी आपल्या इंटीरियर डिझायनिंग ब्रँडचे नाव ‘रोकोको’ ठेवले. अखेर त्यांनी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकत राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि 2019 मध्ये भारतीय जनता पार्टीत सामील झाल्या.