Pinarayi Vijayan ED raid
तिरुवनंतपुरम : केरळचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते पिनराई विजयन यांच्या निवासस्थानावरील अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) कारवाईवरून राजकीय गदारोळ तीव्र झाला आहे. विजयन यांच्या तिरुवनंतपुरम येथील निवासस्थानातून ईडीचे अधिकारी बाहेर पडताना हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. विजयन समर्थकांनी ईडी अधिकार्यांच्या पथकाला रोखत कारवर दगडफेक केली.
कन्नूरमधील पिनराई विजयन यांच्या घरावर सुरू असलेली ईडीची छापेमारी संपल्यानंतर अधिकारी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते, परंतु पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना गेटवरच रोखले. कार्यकर्ते घोषणाबाजी करत ईडी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारू लागले आणि गेटबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले. वाहनावर दगडफेक परिस्थिती हाताळण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि स्थानिक पदाधिकारी समर्थकांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते. बऱ्याच वेळपर्यंत तिथे गोंधळ आणि धक्काबुक्कीची परिस्थिती निर्माण झाली होती, ज्यानंतर अधिकाऱ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले.
या प्रकरणावर CPI(M) चे सरचिटणीस एम. ए. बेबी यांनी केंद्र सरकार आणि ईडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ही संपूर्ण कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असून विरोधी पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य करण्याच्या रणनीतीचा हा एक भाग आहे, असे त्यांनी म्हटले.देशाच्या विविध भागांत, दिल्लीसह अनेक ठिकाणी मोठ्या राजकीय नेत्यांवर, मुख्यमंत्र्यांवर आणि उपमुख्यमंत्र्यांवर खोटे आरोप लावून अटक करण्यात आली आहे. अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्या प्रकरणातही आपण पाहिले की ट्रायल कोर्टाने (कनिष्ठ न्यायालयाने) त्यांना दिलासा दिला. त्यामुळे हा भाजप-आरएसएसच्या राजकीय रणनीतीचाच एक भाग आहे, असा आरोपही बेबी यांनी केला.
आज ईडीने केरळमध्ये १० ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी केली. यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते पिनराई विजयन आणि त्यांची मुलगी वीणा विजयन यांच्या ठिकाणांचाही समावेश आहे. ही कारवाई मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे प्रकरण कोची येथील 'कोची मिनरल्स अँड रुटाईल लिमिटेड' (CMRL) शी संबंधित कथित बेकायदेशीर पेमेंट आणि आर्थिक अनियमिततेशी संबंधित आहे. २०१७ मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची मुलगी वीणा यांच्या एक्सालॉजिक कंपनीने कोची मिनरल्स अँड रुटाईल लिमिटेड (CMRL) सोबत सॉफ्टवेअर आणि मार्केटिंग सेवा देण्यासाठी एक औपचारिक करार (कॉन्ट्रॅक्ट) केला होता. या कराराच्या आडून कोणतेही काम न करता कोट्यवधी रुपयांचे संशयास्पद व्यवहार केले गेल्याचा आरोप आहे. या कथित आर्थिक गैरव्यवहाराचा खुलासा सर्वात आधी वर्ष २०१९ मध्ये झाला होता, जेव्हा आयकर (IT) विभागाने सीएमआरएलच्या (CMRL) ठिकाणांवर मोठी छापेमारी केली होती. आयकर विभागाने या शोध मोहिमेनंतर एक सविस्तर तपास अहवाल सादर केला होता, ज्यामध्ये माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलीच्या कंपनीला करण्यात आलेल्या संशयास्पद पेमेंटचा पहिल्यांदाच अधिकृतपणे उल्लेख करण्यात आला होता.
केंद्र सरकारने जानेवारी २०२४ मध्ये एक्सालॉजिक सोल्युशन्स, सीएमआरएल आणि केरळ राज्य औद्योगिक विकास महामंडळ (KSIDC) यांच्याशी संबंधित आर्थिक अनियमिततेच्या या गंभीर आरोपांच्या तपासाचे आदेश एसएफआयओला (SFIO) दिले होते. विशेष म्हणजे, या प्रकरणाशी संबंधित खाजगी कंपनी CMRL मध्ये सरकारी संस्था KSIDC ची एकूण १३.४ टक्के भागीदारी आहे. एसएफआयओचा तपास आणि आयकर विभागाच्या अहवालाला आधार बनवत अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अखेर मार्च २०२४ मध्ये या संपूर्ण आर्थिक घोटाळ्यात मनी लाँड्रिंगचा एक नवा गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणात आपला तपास पुढे नेत ईडीने आता मुख्यमंत्री आणि त्यांच्या मुलीच्या ठिकाणांवर ही मोठी छापेमारी केली आहे, ज्यामुळे केरळमधील राजकीय वातावरण शिगेला पोहोचले आहे.