Kerala CM Race 2026
नवी दिल्ली : केरळ विधानसभा निवडणुकीत यूडीएफने (UDF) मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्री निवडीवरून अद्यापही पेच कायम आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस हाय कमांडने केरळमधील आणखी काही महत्त्वाच्या नेत्यांना दिल्लीला पाचारण केले आहे. विविध गटांचे दावे आणि मित्रपक्षांमधील अस्वस्थता यामुळे सरकार स्थापनेची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी काँग्रेसवर दबाव वाढत आहे.
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीने (UDF) केरळ विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. याला आता आठवडा उलटला तरी, राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण असेल यावरील सस्पेन्स कायम आहे. पक्षाच्या हाय कमांडने अद्याप यावर अंतिम निर्णय घेतलेला नाही. ४ मे रोजी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले, मात्र काँग्रेस नेतृत्वाने अद्याप विधिमंडळ पक्षनेत्याच्या (CLP) नावाची घोषणा केलेली नाही. दिल्लीत सल्लामसलत सुरू असतानाच, या विलंबामुळे पक्षामध्ये आणि मित्रपक्षांमध्ये राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
काँग्रेस हाय कमांडने केरळच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना राष्ट्रीय राजधानीत बोलावले असून, सरकार स्थापनेबाबत आणि मुख्यमंत्री निवडीबाबत त्यांचे मत जाणून घेतले जाणार आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि नवनिर्वाचित आमदार के. मुरलीधरन यांना मंगळवारी दिल्लीतील एआयसीसी (AICC) मुख्यालयात पोहोचण्यास सांगण्यात आले आहे. माध्यमांशी बोलताना मुरलीधरन यांनी सांगितले की, पुढील ४८ तासांत केरळच्या मुख्यमंत्र्याबाबतचा निर्णय अपेक्षित आहे. मुरलीधरन यांच्याशिवाय पक्षाने केपीसीसी (KPCC) उपाध्यक्ष एपी अनिल कुमार, शफी परंबिल, पीसी विष्णूनाथ आणि ज्येष्ठ नेते तिरुवंचूर राधाकृष्णन यांनाही चर्चेसाठी दिल्लीला बोलावले आहे.
केरळ विधानसभेची मुदत २३ मे रोजी संपत आहे, त्यामुळे काँग्रेस नेतृत्वावर ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे दडपण आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत रमेश चेन्नीथला, के.सी. वेणुगोपाल आणि व्ही.डी. सतीशन (विरोधी पक्षनेते) यांची नावे आघाडीवर आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी शनिवारी सतीशन, वेणुगोपाल, चेन्नीथला, केपीसीसी प्रमुख सनी जोसेफ आणि केरळच्या प्रभारी सरचिटणीस दीपा दासमुन्शी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. सूत्रांच्या माहितीनुसार, बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा वेणुगोपाल यांना असल्याचे समजते, तर सतीशन हे जनतेमध्ये अधिक लोकप्रिय मानले जातात.
सोमवारी रमेश चेन्नीथला यांनी निर्णयातील विलंबाचे समर्थन करताना सांगितले की, ही पक्षांतर्गत लोकशाही प्रक्रिया आहे. ते म्हणाले, "आम्हाला जे काही सांगायचे होते ते हाय कमांडला सांगितले आहे. त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले असून, आता अंतिम निर्णय तेच घेतील. हाय कमांड जो निर्णय घेईल, तो केरळमधील काँग्रेस आणि यूडीएफ कार्यकर्त्यांना मान्य असेल." दरम्यान, दिल्लीतील बैठकांनंतर केरळच्या नेत्यांनी आणि दीपा दासमुन्शी यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की, मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतील कोणत्याही वैयक्तिक नेत्याच्या समर्थनार्थ निदर्शने करू नयेत किंवा फ्लेक्स बोर्ड लावू नयेत.
निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या विजयानंतरही या विलंबामुळे यूडीएफच्या काही मित्रपक्षांमध्ये अस्वस्थता असल्याचे वृत्त आहे. १४० सदस्यांच्या केरळ विधानसभेत यूडीएफने १०२ जागा जिंकून दोन-तृतीयांश बहुमताचा टप्पा पार केला आहे. काँग्रेसने ६३ जागांवर विजय मिळवला आहे. तर इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) ने २२, केरळ काँग्रेसने ८ तर रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टीने ३ जागांवर विजय मिळवला आहे.