पुढारी ऑनलाईन डेस्क : मेंदू खाणारा अमिबा हा जगातील सर्वांत घातक आजारांपैकी एक मानला जातो. हा आजार झाल्यानंतर यात मृत्यूची शक्यता तब्बल ९७ टक्के इतकी जास्त आहे. अशा स्थितीत केरळमधील एक १४ वर्षांच्या मुलाने या आजारावर मात केली आहे. मेंदू खाणाऱ्या अमिबाच्या संसर्गावर मात करणारा तो जगातील तो फक्त नववा व्यक्ती ठरला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलिया, अमेरिका, मेक्सिको आणि पाकिस्तान या चार देशांतील एकूण ८ रुग्णांनी या आजारावर मात केल्याच्या नोंदी आहेत.
बचावलेल्या या मुलाचे नाव अफनान जसिम सिद्धिकी असे आहे. या आजाराचे वेळेत निदान होऊ शकल्याने अफनान बचावू शकला असे वैद्यकीत तज्ज्ञांचे मत आहे.
अफनान हा कोशिकोड येथील एका तलावात पोहायला गेला होता. त्यानंतर पाच दिवसांनी त्याला फीट येणे, डोकेदुखी अशा तक्रारी सुरू झाल्या. अफनानच्या पालकांनी त्याला स्थानिक डॉक्टरकडे नेले, पण त्याच्या तब्येतील सुधारणा झाली नाही. पण त्याचे वडील एम. के. सिद्दिकी यांनी प्रसंगावधना राखत अफनान याला मेंदूरोग तज्ज्ञांकडे नेले आणि वेळीच निदान झाल्याने तो या आजारातून बचावू शकला.
सिद्धिकी म्हणाले, "मी सोशल मीडियावर मेंदू खाणाऱ्या अमिबाबद्दल वाचले होते. अफनानमध्ये दिसणारी लक्षणं या आजारासारखी होती, म्हणून मी त्याला तातडीने कोशिकोड येथील बेबी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये नेण्याचा निर्णय घेतला."
या हॉस्पिटलमध्ये डॉ. अब्दूल रौफ यांनी अफनानवर उपचार केले. "लक्षणं दिसू लागल्यानंतर चोवीस तासांमध्ये आजाराचे निदान झाले आणि आम्ही तातडीने उपचार सुरू करू शकलो," असे ते म्हणाले.
वैद्यकीय भाषेत या आजाराला Primary Amoebic Meningoencephalitis (PAM) असे नाव आहे. यामध्ये Naegleria fowleri नावाचा अमिबा नाकावाटे मेंदूत प्रवेश करतो. मेंदूमध्ये हा अमिबा वेगवेगळी रसायने सोडतो, त्यातून मेंदूतील पेशी नष्ट होऊ लगतात. यातून डोक्याच्या कवटीत अधिक द्रव निर्माण होते आणि त्याचा मेंदूवर दबाव वाढतो, यात रुग्णाचा मृत्यू होतो. या आमिबाचा संसर्ग झाल्यानंतर डोकेदुखी, ताप, मळमळणे, उलट्या, मान अवघडणे, तोल जाणे, फिट येणे आणि भास होणे अशी लक्षण दिसू लागतात. या आमिबाच्या संसर्गानंतर ९ तासांनी ते ५ दिवसांत निदान होऊन, उपचार सुरू व्हावे लागतात.
डॉ. रौफ म्हणाले, "दूषित पाण्यात पोहायला गेल्याने हा संसर्ग होऊ शकतो. म्हणून पोहताना कधीही पाण्यात उडी मारू नका, तसेच तोंड आणि नाक पाण्यात बुडवू नका. शिवाय क्लोरिनेशनचा वापर करून पाणी शुद्ध करावे लागते. दूषित पाण्यात पोहायला न जाणे हा चांगला उपाय आहे."
बीबीसीने दिलेल्या बातमीत म्हटले आहे की १९६५पासून आजपर्यंत या आजाराचे ४०० रुग्ण आढळले आहेत. भारतातील या रुग्णांची संख्या आतापर्यंत ३० इतकी आहे. या वर्षी केरळमध्ये सहा रुग्ण आढळून आले आहेत. यातील तिघांचा मृत्यू झाला आहे, तर एक रुग्ण गंभीर आहे. आणखी एक रुग्ण उपचारांना प्रतिसाद देत आहे.