kerala 100 students report fever vomiting health department orders school close week
पुढारी ऑनलाईन : केरळमधील वायनाड जिल्ह्यातील एका शाळेतील सुमारे १०० विद्यार्थ्यांना ताप आणि उलट्यांचा त्रास झाल्याची घटना समोर आली आहे. या विद्यार्थ्यांना उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले. या घटनेनंतर आरोग्य विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित शाळा आठवडाभर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
वायनाड जिल्ह्यातील कल्पेट्टा येथील सेंट जोसेफ हायर सेकंडरी स्कूलमध्ये हा प्रकार घडला. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेतील जवळपास १०० विद्यार्थ्यांना ताप आणि उलट्यांचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना उपचारासाठी विविध रुग्णालयांत नेण्यात आले.
तपासणीत काय आढळले?
विद्यार्थ्यांच्या प्रकृतीबाबत तक्रारी आल्यानंतर आरोग्य विभागाच्या पथकाने सेंट जोसेफ हायर सेकंडरी स्कूलची पाहणी केली. या तपासणीत शाळेच्या परिसरातील पाण्याची टाकी आणि विहीर निर्जंतुक करण्यात आली नसल्याचे आढळून आले. त्यामुळे दूषित पाण्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शाळा प्रशासनाला आरोग्य विभागाचे निर्देश
आजाराचा प्रादुर्भाव आणखी वाढू नये, यासाठी आरोग्य विभागाने शाळा प्रशासनाला आठवडाभर शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. या कालावधीत शाळेच्या परिसरातील विहीर, पाण्याच्या टाक्या आणि संपूर्ण परिसराची स्वच्छता करून निर्जंतुकीकरण करण्यास सांगण्यात आले आहे.
या तपासणीचे नेतृत्व कल्पेट्टा जनरल हॉस्पिटलचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्याम यांनी केले. आरोग्य विभागाने दिलेल्या निवेदनानुसार, या पाहणीमध्ये आरोग्य निरीक्षक पी. ए. नवास तसेच कनिष्ठ आरोग्य निरीक्षक सुरेश कुमार आणि बिबिन वर्गीस यांचाही सहभाग होता.