राष्ट्रीय

वैद्यकीय चाचण्यांसाठी जामीनात मुदतवाढ मिळण्यासाठी केजरीवाल सुप्रीम कोर्टात

अविनाश सुतार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा:  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अंतरिम जामीनामध्ये ७ दिवसांची  मुदतवाढ मिळण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. केजरीवाल यांनी आरोग्याचे कारण देत वैद्यकीय चाचण्यांसाठी सात दिवसांची मुदतवाढ हवी, असे याचिकेत म्हटले आहे. 

अरविंद केजरीवाल यांना जामीनासाठी मुदतवाढ कशासाठी हवी?

  • वैद्यकीय चाचण्यांसाठी सात दिवसांची मुदतवाढ हवी
  • वजन कमी झाले असून केटोन पातळी अत्यंत वाढली आहे.
  • 'पीएटी-सीटी स्कॅन'सह काही वैद्यकीय चाचण्यां करणे आवश्यक

दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना  लोकसभा निवडणुकीच्या  प्रचारासाठी  सर्वोच्च न्यायालयाने १० मे रोजी २१ दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. शेवटच्या टप्प्यात १ जून रोजी मतदान होणार आहे. मतदान होताच केजरीवाल यांना २ जून रोजी तिहार तुरुंगात परतावे लागणार आहे. 

जामिनाची मुदत १ जून रोजी संपत असल्याने ती वाढवून मिळण्यासाठी केजरीवाल यांनी आरोग्याचे कारण दिले आहे. माझे वजन कमी झाले असून केटोन पातळी अत्यंत वाढली आहे. त्यामुळे 'पीएटी-सीटी स्कॅन'सह काही वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी अंतरिम जामीनामध्ये सात दिवसांची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

आरोग्याचे कारण पुढे करुन अंतरिम जामीन वाढवण्याची केजरीवालांची मागणी म्हणजे, 'नाटक' आहे, असा हल्लाबोल भाजपने केला आहे. निवडणूक प्रचार करताना केजरीवाल यांना  कोणतीही अडचण आली नाही. मात्र, आता तुरुंगात परत जाण्याची वेळ आल्यावर ते गंभीर आजाराने ग्रस्त झाले आहेत. पंजाबमध्ये प्रचार करण्याऐवजी त्यांनी  वैद्यकीय तपासण्या कराव्यात," असा सल्ला दिल्ली भाजपचे  प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सचदेवा यांनी दिला आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT