kedarnath temple open on 2 may
पुढारी ऑनलाईन :
केदारनाथ मंदिराचे कपाट २ मे रोजी उघडण्यात येणार आहेत. यानंतर चारधाम यात्रेला सुरूवात होईल. त्या पार्श्वभूमीवर केदारनाथ मंदिर फुलांनी सजवण्यात आले आहे. जर तुम्ही केदारनाथ धामची यात्रा करण्याचे नियोजन करत असाल, तर काही गोष्टी जाणून घणे तुमच्यासाठी योग्य ठरेल.
गढवाल हिमालयाच्या मनमोहक डोंगररांगांमध्ये केदारनाथ मंदिर आहे. सहा महिने बंद राहिल्यानंतर २ मे २०२५ रोजी भक्तांसाठी या मंदिराचे दरवाजे पुन्हा उघडणार आहेत. ज्याची तयारी सुरू झाली आहे. मंदिराला रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आले आहे. हे सजवलेले मंदिर पाहून भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटते. केदारनाथ मंदिर हे हिंदूंच्या पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. जे चार धाम मधील एक धाम आहे. दरवर्षी भक्त या यात्रेत सहभागी होण्यासाठी केदाननाथला येतात. केदारनाथ हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. जे उत्तराखंडच्या रूद्रप्रयाग जिल्ह्यात ११,९६८ फूट उंचीवर वसले आहे. जर तुम्ही या वर्षी केदारनाथला जाणार असाल, तर काही महत्वाच्या गोष्टी ध्यानात घ्ययला हव्यात, ज्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये.
केदारनाथ मंदिर २ मे २०२५ रोजी पुन्हा उघडेल, जे चार धाम यात्रेच्या हंगामाची सुरुवात आहे. या सहलीसाठी नोंदणी सुरू आहे आणि डेहराडून स्मार्ट सिटी पोर्टलद्वारे ऑनलाइन नोंदणी करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. नोंदणी प्रक्रियेसाठी कोणतेही पैसे देण्याची आवश्यकता नाही.
जर तुम्ही मंदिराला भेट देणार असाल तर यावेळी रील/व्हिडिओ बनवणाऱ्यांसाठी कडक नियम बनवण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत यात्रेकरूंना मंदिराच्या ३० मीटर अंतरावर मोबाईल फोन आणि कॅमेरे आणण्याची परवानगी नाही. प्रत्येकाने हा नियम पाळला पाहिजे.
नियमांनुसार, केदारनाथ मंदिर परिसरात फक्त नोंदणीकृत यात्रेकरूंनाच प्रवेश दिला जाईल. यासोबतच, मंदिर परिसरात टिळक लावणे, प्रसाद अर्पण करणे आणि मूर्ती, पुस्तके आणि घंटा यांना स्पर्श करणे प्रतिबंधित आहे. केदारनाथ यात्रेसाठी सुमारे १६ किलोमीटरची तीव्र चढाई (पायी प्रवास) करावी लागते.
सुरक्षेच्या उपाययोजना लक्षात घेऊन, केदारनाथ मंदिरात येणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूची तपासणी केली जाईल. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, तपासणी कडक करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत यात्रेकरूंना तपासणी प्रक्रियेदरम्यान पूर्ण सहकार्य करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
या ठिकाणी पायी प्रवास करावा लागतो. त्यासाठी स्वत:ला शारिरीक स्तरावर तयार ठेवणे गरजेचे आहे. यात्रेदरम्यान खडतर पायी प्रवास करावा लागतो. यामध्ये ट्रेकिंग करणे, पायऱ्या चढणे यासारख्या गोष्टी कराव्या लागतात. म्हणून, उत्तराखंड सरकारने भाविक यात्रेकरूंना वैद्यकीय तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे. जर तुम्ही पूर्णपणे तंदुरुस्त असाल तरच केदारनाथ यात्रेसाठी जाणे योग्य ठरेल असे सांगण्यात येत आहे.