Kedarnath Viral Video Pudhari
राष्ट्रीय

Kedarnath Viral Video: केदारनाथमध्ये धक्कादायक प्रकार! महाराष्ट्रातील शिक्षकाने घोडेवाहकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल

Kedarnath Viral Video: केदारनाथ पदयात्रा मार्गावर एका प्रवाशाने स्थानिक घोडेवाहकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Kedarnath Viral Video: उत्तराखंडमधील प्रसिद्ध केदारनाथ मंदिर यात्रेदरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केदारनाथ पदयात्रा मार्गावर एका प्रवाशाने स्थानिक घोडेवाहकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा वाद एका छोट्याशा घटनेतून सुरू झाला. केदारनाथच्या चढाईदरम्यान एका घोड्याचा तोल गेल्याने तो घसरल्याची घटना घडली. यानंतर संबंधित प्रवासी आणि स्थानिक घोडे-खच्चर चालक यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला. मात्र, काही क्षणांतच हा वाद इतका वाढला की परिस्थिती हाताबाहेर गेली.

महाराष्ट्रातील एका सरकारी शिक्षकाने संतापाच्या भरात घोडेवाहकाला मारहाण केल्याचा आरोप आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संबंधित प्रवासी घोडेवाहकावर हात उचलताना स्पष्ट दिसत आहे. आजूबाजूला उपस्थित काही लोक हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही दिसते.

घटना समोर आल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अनेकांनी यात्रेसारख्या धार्मिक आणि संवेदनशील ठिकाणी अशा प्रकारच्या हिंसक वर्तनाचा निषेध केला आहे. तर काहींनी संपूर्ण घटना आणि वादाचे नेमके कारण समोर येणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.

केदारनाथ यात्रा ही दरवर्षी लाखो भाविकांसाठी श्रद्धेचा केंद्रबिंदू असते. कठीण डोंगराळ मार्गामुळे अनेक यात्रेकरू घोडे आणि खच्चर सेवांचा वापर करतात. अशा परिस्थितीत यात्रेकरू आणि स्थानिक सेवा पुरवठादार यांच्यात समन्वय आणि संयम आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, या घटनेप्रकरणी स्थानिक प्रशासनाने किंवा पोलिसांनी कोणती कारवाई केली आहे का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, व्हायरल व्हिडिओमुळे हा प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT