Kashmir autumn red golden beauty 
राष्ट्रीय

Kashmir Red Golden beauty|लाल, सोनेरी रंगांत न्हाले काश्मीर, शरद ऋतूत चित्रपटांपेक्षाही प्रत्यक्षातील सौंदर्य अधिक विलोभनीय

Kashmir autumn red golden beauty- लाल, सोनेरी रंगांत न्हाले काश्मीर, शरद ऋतूत चित्रपटांपेक्षाही प्रत्यक्षातील सौंदर्य अधिक विलोभनीय

पुढारी वृत्तसेवा

जम्मू : अनिल साक्षी

शरद ऋतूच्या आगमनाने काश्मीर खोऱ्याचे रूप अक्षरशः पालटले असून, संपूर्ण परिसर लाल, सोनेरी पिवळ्या आणि अंबर रंगांच्या छटांनी सजला आहे. निळ्याशार स्वच्छ आकाशाच्या पार्श्वभूमीवर डौलाने उभी असलेली भव्य चिनारची झाडे रंगीबेरंगी पानांनी बहरली आहेत. जमिनीवर पडलेल्या लाल-पिवळ्या पानांचा जणू मखमली गालिचा तयार झाला असून, या निसर्गसौंदर्याने पर्यटकांना भुरळ घातली आहे. काश्मीरचे हे विलोभनीय रूप अनुभवण्यासाठी देशाच्या विविध भागांतून हजारो पर्यटक घाटीत दाखल होत आहेत.

पर्यटनस्थळांवर वर्दळ

निशात गार्डन, नसीम बाग आणि चिनार बाग या प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर सध्या पर्यटकांची विशेष वर्दळ पाहायला मिळत आहे. उंचच उंच चिनार वृक्षांच्या सावलीत फेरफटका मारणे, झाडांवरून अलगद खाली पडणाऱ्या रंगीबेरंगी पानांचे सौंदर्य न्याहाळणे आणि या नयनरम्य वातावरणात छायाचित्रे टिपणे, यामध्ये पर्यटक रमले आहेत. कुटुंबीय, नवविवाहित जोडपी आणि निसर्गप्रेमींसाठी काश्मीरचा हा शरदऋतू अविस्मरणीय अनुभव ठरत आहे. विशेष म्हणजे, बॉलिवूड चित्रपटांमधून काश्मीरच्या शरदऋतूची मोहक दृश्ये पाहून येथे येणाऱ्या अनेक पर्यटकांना प्रत्यक्षातील सौंदर्य चित्रपटांपेक्षाही अधिक आकर्षक वाटत आहे. चिनारच्या झाडांतून झिरपणारे सोनेरी ऊन, हळुवारपणे जमिनीवर पडणारी लालसर पाने आणि सभोवतालचा निसर्गरम्य परिसर यामुळे काश्मीरचे सौंदर्य प्रत्येक ऋतूत नव्याने खुलते.

पर्यटक सुखावले...

पर्यटक पारुल गुप्ता यांनी या अनुभवाबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले की, त्यांच्या मूळ परिसरात शरद ऋतूत निसर्गाच्या रंगांमध्ये इतका नाट्यमय बदल पाहायला मिळत नाही. त्यामुळे काश्मीरमधील हे दृश्य त्यांच्यासाठी विशेष आनंददायी आहे. पतीसोबत हनिमूनसाठी काश्मीरला आलेल्या शालू यांनीही येथील सौंदर्याची प्रशंसा केली. दूरचित्रवाणी किंवा मोबाईलवर पाहिलेली दृश्ये प्रत्यक्षातील अनुभवाच्या तुलनेत फिकी वाटतात, असे त्यांनी सांगितले. या निसर्गसौंदर्यामुळे मोबाईल बाजूला ठेवून त्या क्षणाचा प्रत्यक्ष आनंद घेण्याची प्रेरणा मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT