Kanpur Karwa Chauth dispute File Photo
राष्ट्रीय

Viral News: तीन बायका फजिती ऐका..; करवा चौथची पूजा आधी कोणी करायची? भररस्त्यात राडा, पोलिसांची मध्यस्थी, अखेर काय ठरलं?

एकाच पतीवरून तीन पत्नींमध्ये करवा चौथची पूजा आधी कोणी करायची, यावरून मोठा वाद झाला. तिन्ही महिला पोलीस ठाण्यात पोहोचल्या आणि प्रत्येकीने त्या पतीवर आपला हक्क सांगितला. शेवटी काय झालं?

पुढारी वृत्तसेवा

Viral News

कानपूर: उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक अजब प्रकरण समोर आले आहे. एकाच पतीवरून तीन पत्नींमध्ये करवा चौथची पूजा आधी कोणी करायची, यावरून मोठा वाद झाला. तिन्ही महिला पोलीस ठाण्यात पोहोचल्या आणि प्रत्येकीने त्या पतीवर आपला हक्क सांगितला. बराच वेळ त्यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. मात्र, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आणि मोठ्या नाट्यमय घडामोडींनंतर अखेर या वादावर तोडगा निघाला.

मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरच्या बिठूर परिसरातील एका गावात राहणाऱ्या व्यक्तीला पहिल्या लग्नानंतर अनेक वर्षे अपत्य नव्हते. त्यामुळे त्याच्या पहिल्या पत्नीनेच आपल्या एका मैत्रिणीशी त्याचे दुसरे लग्न लावून दिले. या दुसऱ्या पत्नीपासून त्याला एक मुलगी झाली. त्यानंतर त्याने तिसरे लग्नही केले. करवा चौथच्या दिवशी तिसरी पत्नी घरी आली आणि तिने पतीसोबत सर्वात आधी पूजा करण्याचा हट्ट धरला. यावरून तिन्ही महिलांमध्ये वाद सुरू झाला.

हा घरगुती वाद मंधाना पोलीस चौकीपर्यंत पोहोचला. पहिली आणि दुसरी पत्नी पोलीस चौकीच्या आत होत्या, तर तिसरी पत्नी बाहेर थांबली होती. पोलिसांच्या उपस्थितीत समजूत काढल्यानंतर दोन पत्नी तिथून बाहेर पडल्या; पण बाहेर रस्त्यावर पुन्हा एकदा तिन्ही महिलांमध्ये वाद सुरू झाला. शेवटी त्यांनी स्वतःहून एक तोडगा काढला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, तिघींनीही उपवास ठेवून एकत्र पूजा करण्याचे मान्य केले. दरम्यान, बिठूरच्या पोलीस निरीक्षकांना या घटनेबद्दल विचारले असता, अशी कोणतीही घटना घडल्याची माहिती आपल्याला नसल्याचे त्यांनी सांगितले.

प्रियकराच्या घरी उपवास सोडण्यासाठी पोहोचली तरुणी

दुसऱ्या एका घटनेत, एक तरुणी मंधाना पोलीस चौकीत पोहोचली आणि तिने आपल्या प्रियकराच्या घरी जाऊन करवा चौथचा उपवास सोडण्याचा आग्रह धरला. तिच्या प्रियकरानेही तिला घरी नेण्यासाठी पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली. पोलीस चौकीत अनेक तास चाललेल्या चर्चेनंतर, अखेर त्याच्या कुटुंबीयांनी दोघांच्या लग्नाला संमती दिली. त्यानंतर ती तरुणी आपल्या प्रियकराच्या घरी गेली आणि तिथे तिने आपला उपवास सोडला. बिठूर परिसरात एकमेकांसमोर राहणाऱ्या या जोडप्याचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते.

दोघेही अल्पवयीन असल्यामुळे कुटुंबीयांचा या नात्याला विरोध होता, त्यामुळे त्यांनी काही काळ एका भाड्याच्या खोलीत एकत्र राहण्यास सुरुवात केली. दोघे प्रौढ झाल्यावर तरुणाने लग्नाचा प्रस्ताव मांडला, परंतु त्याच्या कुटुंबीयांनी त्यास नकार दिला. करवा चौथच्या दिवशी उपवास करणारी ती तरुणी आपल्या प्रियकरासोबत मंधाना पोलीस चौकीत पोहोचली आणि तिने उपवास सोडण्यासाठी प्रियकराच्या घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली. अखेर दोन्ही कुटुंबे त्यांच्या लग्नासाठी राजी झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT