बंगळूर : राज्य काँग्रेसमध्ये सत्तावाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा मुद्दा ऐरणीवर असताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार मंगळवारी (दि. 13) लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी सल्लामसलत करणार आहेत. राहुल गांधी मंगळवारी म्हैसूरमार्गे केरळमधील वायनाड मतदारसंघात जाणार असून, म्हैसूरमध्ये सिद्धरामय्या आणि शिवकुमार त्यांची भेट घेतील.
आठवडाभरापासून विदेश दौऱ्यावर असलेले राहुल गांधी परतले आहेत. वायनाड हा प्रियांका गांधींचा लोकसभा मतदारसंघ आहे. राहुल वायनाडला जाण्यासाठी खास विमानाने म्हैसूरला सकाळी पोहोचतील. त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना म्हैसूरला येण्याची सूचना केली आहे. त्यानुसार हे देोघे मंगळवारी दुपारी स्वतंत्रपणे म्हैसूरला रवाना होणार आहेत.
प्रदेश काँग्रेसच्या अनेक मुद्द्यांवर राहुल गांधींशी चर्चा होण्याची शक्यता आहे. सत्ता हस्तांतरण आणि मंत्रिमंडळ फेरबदलावरही चर्चा अपेक्षित आहे. यासोबतच केपीसीसी अध्यक्ष बदल, पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांची नियुक्ती यावरही खल होईल. राज्यातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार 16 फेब्रुवारीरोजी एक हजार दिवस पूर्ण करणार आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्री सिद्धरामय्या हावेरीमध्ये भव्य मेळावा आयोजित करण्याची योजना आखत आहेत. मेळाव्याच्या उद्घाटनासाठी राहुल गांधींना आमंत्रित केले जाणार आहे. गेल्या 1 हजार दिवसांत काँग्रेसने जाहीरनाम्यातील अनेक आश्वासने पूर्ण केली आहेत. यात हमी योजनांचा समावेश आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मतदारांचे आभार मानण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री शिवकुमार 26 जानेवारीपासून मनरेगा योजनेवरील जनआंदोलन बैठकांची माहिती देणार आहेत.
सिद्धरामय्यांकडून विक्रमी 17 व्या अर्थसंकल्पाची तयारी
राज्यात सत्तावाटपाबाबत गोंधळ असतानाच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मार्चमध्ये आपला विक्रमी 17 वा अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी सुरू केली आहे. आतापर्यंत देशाच्या राजकारणात सर्वाधिक 16 अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम गुजरातचे तत्कालीन अर्थमंत्री वजूभाई वाला यांनी केलेला आहे. तो विक्रम अर्थखाते सांभाळणारे सिद्धरामय्या यंदा करतील. संक्रांतीनंतर नेतृत्वात बदल होईल, अशा चर्चा गेल्या सप्टेंबरपासून सुरू आहेत. मुख्यमंत्रिपदासाठी शिवकुमार जोरदार प्रयत्न करत आहेत. मात्र आता सिद्धरामय्याच विक्रमी अर्थसंकल्पाची तयारी करत आहेत. येत्या 6 मार्च रोजी हा विक्रमी अर्थसंकल्प मांडण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अर्थसंकल्पात काय?
बंगळूरमधील 5 महामंडळांसह राज्यातील नागरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एप्रिल किंवा मे महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. यासाठी सिद्धरामय्यांनी अर्थसंकल्पात लोककल्याणकारी योजना जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य विधिमंडळाचे संयुक्त अधिवेशन 2 मार्च रोजी सुरू होईल.