बंगळूर : काही महिन्यांपासून राज्यात मंत्रिमंडळ फेरबदल व नेतृत्व बदलावर जोरदार चर्चा सुरू असतानाच गुरुवारी काही मंत्री आणि आमदारांसह मुख्यमंत्री सिद्धरामय्या अचानक दिल्लीला रवाना झाले. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमारही शुक्रवारी दिल्लीला रवाना होणार आहेत. सरकार स्थापनेला अडीच वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री बदल अपेक्षित असून, घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे काँग्रेस आमदारांत उत्सुकता आहे. शुक्रवारी दोन्ही नेते हायकमांडला भेटणार असून, त्यानंतर निर्णय होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांसमवेत मंत्री चलुवराय स्वामी, आमदार मागडी बाळकृष्ण, गुब्बी श्रीनिवास, टी. डी. राजेगौड दिल्लीला गेले. शुक्रवारी काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या भेटीची वेळ निश्चित करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली आणखी एक पथक शुक्रवारी सकाळी दिल्लीला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.नेतृत्व बदल व मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. 20 नोव्हेंबर रोजी राज्य सरकारने सत्तेची अडीच वर्षे पूर्ण केली. मे 2023 मध्ये ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार पहिली अडीच वर्षे सिद्धरामय्या मुख्यमंत्री, तर पुढची अडीच वर्षे शिवकुमार मुख्यमंत्री राहतील, यावर एकमत झाल्याचे मानले जाते. त्यानुसार आता सिद्धरामय्यांनी पायउतार व्हावे, अशी मागणी शिवकुमारांचे समर्थक आमदार करू लागले आहेत. त्यामुळे हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
मंत्रिमंडळ फेरबदलाच्या वातावरणातच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कारभाराची अडीच वर्षे पूर्ण केली आहेत. त्यानिमित्त बोलताना, ‘जोपर्यंत जनतेचा आशीर्वाद सोबत राहील, तोपर्यंत मी राज्याचा मुख्यमंत्री राहीन’, असे सिद्धरामय्यांनी सांगितले.
गुरुवारी चामराजनगर येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘जोपर्यंत माझ्यावर जनतेचा आशीर्वाद आहे, तोपर्यंत मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून राहीन. आगामी विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार अस्तित्वात येईल, असा विश्वास आहे. आतापर्यंत सत्तावाटपाच्या मुद्द्यावर चर्चा झाली नव्हती; मात्र मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला सुरुवात झाली, तेव्हापासून नेतृत्व बदलाचा मुद्दा चर्चेत आला आहे.’ अडीच वर्षांनी मंत्रिमंडळात फेरबदल करायला हवेत, असे मी म्हटले होते. त्या मुद्द्यावर बरीच चर्चा झाली. येत्या 2028 मध्ये कोणाच्या नेतृत्वाखाली आपण निवडणुकांना सामोरे जावे, हे येत्या काळात ठरवू, असेही मुख्यमंत्री म्हणाले. चामराजनगरचा दौरा करणाऱ्यांची सत्ता जाते, या अंधश्रद्धेवर माझा विश्वास नाही. मी जसा राज्यातील इतर जिल्ह्यांना भेट देतो, त्याचप्रमाणे चामराजनगरलाही भेट दिली, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
माजी खासदार डी. के. सुरेश यांनी एक आश्चर्यकारक विधान केले आहे. सरकारने सत्तेची अडीच वर्षे पूर्ण केली आहेत. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की, मुख्यमंत्री सिद्धरामय्या आपला शब्द मोडणार नाहीत, असे विधान उपमुख्यमंत्र्यांचे भाऊ आणि माजी खासदार डी. के. सुरेश यांनी केले आहे. पत्रकारांशी बोलताना सुरेश म्हणाले, माझे भाऊ उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे भाग्यवान असून ते राज्याचे मुख्यमंत्री होतील. यासंदर्भात हायकमांड योग्य निर्णय घेईल. सरकार स्थापनेपासून आतापर्यंत हायकमांड पातळीवर झालेल्या सर्व चर्चांचा मी साक्षीदार आहे. डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री व्हावेत, अशी प्रत्येकाची इच्छा आहे. त्यामुळे पक्षाच्या चौकटीत काम करणारे आदेशाचे पालन करतील, असा विश्वास आहे. ‘एक व्यक्ती, एक पद’ या काँग्रेसच्या धोरणानुसार प्रदेशाध्यक्ष असलेले उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याचीही तयारीही बुधवारी इंदिरा गांधी जयंती कार्यक्रमात दर्शवली. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपद दिले जाईल, असा विश्वास सुरेश यांनी व्यक्त केला.