Kapil Sibal Supreme Court Shiv Sena Hearing  Pudhari
राष्ट्रीय

Shiv Sena Hearing:"आता डान्स करायची वेळ आलीय..."; शिवसेनाप्रकरणी युक्‍तीवाद सुरु असताना ॲड. सिब्‍बल असं का म्‍हणाले?

एका मजेशीर प्रसंगामुळे न्‍यायालयातील तणावाचे वातावरण क्षणात झाले हलके-फुलके

पुढारी वृत्तसेवा

Kapil Sibal Supreme Court Shiv Sena hearing : न्यायालयाची वास्तू म्हणजे अन्‍यायाविरुद्‍ध न्यायासाठीचे एक रणांगणच. साहाजिकच येथील चार भिंतींच्या आत चालणारी चर्चा अत्यंत गंभीर वातावरणातच होते. अशा गंभीर वातावरणात हास्यकल्लोळ होणे तसेच दुर्मिळच! पण, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सर्वोच्च न्यायालयातील शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीदरम्यान मंगळवारी (दि. १९) एक वेगळाच रंग भरला गेला. न्‍यायालयात अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर मुद्द्यावर सुनावणी सुरू असताना अचानक असा एक मजेदार प्रसंग घडला की, न्‍यायालयातील तणावाचे वातावरण क्षणात हलके-फुलके झाले.

"मला वाटतं आता डान्स करायची वेळ ..."

सुनावणी सुरु असताना न्यायालयाच्या बाहेर अत्यंत मोठ्या आवाजात गाणी आणि संगीत ऐकू येत होते. या आवाजामुळे व्यत्यय आल्यावर ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी म्‍हणाले, "मला वाटतं आता डान्स करायची वेळ आली आहे," अशी मिश्किल टिप्पणी केली. त्यावेळी खंडपीठावर देशाचे सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची उपस्थित होते.

"कोणीतरी निवडणूक जिंकली असावी..."

'बार अँड बेंच'ने दिलेल्‍या वृत्तानुसार, म्युझिकचा आवाज ऐकून सिब्बल मिश्कीलपणे म्हणाले, "मला वाटतं आता डान्स करण्याची वेळ आली आहे. बाहेर नक्की काय चाललंय हे मला माहित नाही, पण हे धक्कादायक आहे. बहुधा कोणीतरी निवडणूक जिंकली आहे किंवा तसंच काहीतरी मोठं घडलं असावं."

सिब्‍बल यांनी शेअर केला गर्दीचा अनुभव

यावर अधिक बोलताना सिब्बल यांनी कोर्टात येतानाचा आपला अनुभव सांगितला. दुपारी मथुरा रोडवर प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडी असल्याने गाडी सोडून सुप्रीम कोर्टापर्यंत पायपीट करत यावं लागल्याचे त्यांनी सांगितले. यावर न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांनी, "बार लोकशाही फलद्रूप होत आहे," अशी हलकीफुलकी टिप्पणी केली. त्याला उत्तर देताना सिब्बल म्हणाले, "हो, नक्कीच, किमान या न्यायालयात तरी यात काही शंका नाही."

'रात्री उशिरा आले फोन' : सरन्‍यायाधीशांनी शेअर केला रंजक अनुभव

याच चर्चेदरम्यान सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनीही एक रंजक अनुभव शेअर केला. "मला रात्री उशिरा, किंबहुना खूप रात्री निवडणुकीत हस्तक्षेप करण्याच्या विनंतीचे एक-दोन फोन आले होते," असा खुलासा त्यांनी केला. त्यावर सिब्बल म्हणाले की, "या न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राबाहेर असणारे अनेक मुद्दे आधीच आपल्यासमोर प्रलंबित आहेत."शिवसेना वादाच्या अत्यंत तांत्रिक आणि गंभीर युक्तिवादादरम्यान घडलेल्या या गमतीशीर प्रसंगाने कोर्टरूममधील वातावरण काही काळासाठी मोकळे केले. त्यानंतर पुन्हा एकदा युक्तिवाद सुरु झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT