shocking crime news
कानपूर : येथे समाज मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका बापाने आपल्याच ११ वर्षांच्या दोन जुळ्या मुलींची गळा चिरून निर्घृण हत्या केली आहे. धक्कादायक म्हणचे आपल्या मुलींना संपविल्यानंतर आरोपीने स्वतः पोलिसांना फोन करून गुन्ह्याची कबुली दिली. शशी रंजन मिश्रा (वय ४८) असे आरोपीचे नाव असून तो पेशाने मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह (MR) आहे.
रविवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांना या हत्येची माहिती मिळाली. आरोपी शशी रंजन मिश्राच्या पत्नी रेश्मा छेत्री हिने पतीवर गंभीर आरोप केले आहेत. तिने सांगितले की, तिचा पती दारूच्या आहारी गेला होता. तो तिला नियमितपणे मारहाण करायचा, तसेच तिला जेवणापासूनही वंचित ठेवायचा.
दाम्पत्याचा २०१४ मध्ये प्रेमविवाह झाला होता. मात्र लग्नानंतर काही काळातच त्यांच्या नात्यात दुरावा आला. रेश्माच्या दाव्यानुसार, तिच्या पतीने घराच्या कानाकोपऱ्यात, अगदी स्वतःच्या खोलीतही सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे लावले होते. ती आपल्या माहेरी जाण्याचा प्रयत्न करायची, तेव्हा तिला मारहाण केली जात असे. पतीने तिला मुलाला सोबत घेऊन घर सोडून जाण्यास सांगितले होते; पण मुलींना आपल्याकडेच ठेवण्याचा आग्रह धरला होता.
रेश्मा म्हणाली की, पतीच्या जाचाला कंटाळून ती आपल्या मुलासह माहेरी राहायला गेली होती. पतीने मुलींना नेण्यास नकार दिल्यामुळे तिला मुलींना मागे सोडावे लागले होते. मात्र, मुलींशिवाय राहणे कठीण झाल्याने नऊ महिन्यांनंतर ती पुन्हा परतली होती. तिला पतीच्या खोलीत प्रवेश निषिद्ध होता. तो वारंवार स्वतःला आणि मुलींना मारून टाकण्याची धमकी द्यायचा.हत्येच्या रात्री
घटनेच्या रात्रीबाबत माहिती देताना रेश्माने सांगितले की, "शनिवारी रात्री सर्व काही सामान्य होते. आम्ही सर्वांनी एकत्र जेवण केले आणि त्यानंतर पती मुलींना घेऊन त्याच्या खोलीत झोपायला गेला. सीसीटीव्ही फीडमध्ये मी पाहिले की तो बराच वेळ फोनवर बोलत होता. पहाटे २:३० च्या सुमारास त्याने एका मुलीला बाथरूममध्ये नेले आणि काही वेळाने तो खोलीत परतला. त्यानंतर त्याने खोलीचे दिवे बंद केले. त्यानंतर कोणताही आवाज न आल्याने मला वाटले की सर्वजण झोपले आहेत. माझ्या मुलींची हत्या कधी झाली, हे मला समजलेच नाही."
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. फॉरेन्सिक टीमलाही पुरावे गोळा करण्यासाठी पाचारण करण्यात आले. दोन्ही मुलींचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते आणि त्यांच्या गळ्यावर खोल जखमा होत्या. वरिष्ठ पोलीस अधिकारी दीपेंद्र नाथ चौधरी यांनी सांगितले की, "आरोपी पित्याला घटनास्थळावरूनच अटक करण्यात आली आहे. या दुहेरी हत्याकांडामागचा नेमका हेतू काय होता, याचा शोध घेण्यासाठी त्याची चौकशी सुरू आहे.