Lamborghini Accident |
कानपूर : भरधाव लॅम्बोर्गिनी कारने येथील वर्दळीच्या रस्त्यावर रविवारी (दि. ८) मोठा गोंधळ घातला. ग्वाल टोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत या आलिशान कारने उभ्या असलेल्या दुचाकीला आणि रिक्षाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पोलिसांनी लॅम्बोर्गिनी जप्त केली असून गुन्हा दाखल केला आहे. ही कार प्रसिद्ध तंबाखू व्यावसायिक के.के. मिश्रा यांच्या नावावर असून, त्यांचा मुलगा शिवम कुमार मिश्रा कार चालवत असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार,दिल्ली पासिंगची 'लॅम्बोर्गिनी रेव्ह्युएल्टो' ही कार अत्यंत सुसाट वेगात होती. कारने सुरुवातीला एका रिक्षेला धडक दिली आणि त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 'रॉयल एनफिल्ड' दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीस्वार हवेत तब्बल १० फूट उंच उडाला. कार दुचाकीच्या पुढच्या चाकावर चढली आणि काही अंतर फरफटत नेल्यानंतर एका विजेच्या खांबाला धडकून थांबली.
या अपघातात तौफिक अहमद नावाचा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला कित्येक मीटर लांब फेकले गेले. "मी माझ्या दुचाकीजवळ उभा होतो, तेव्हा अचानक या कारने मला उडवले," असे तौफिकने सांगितले. इतर जखमींनाही गंभीर फ्रॅक्चर आणि जखमा झाल्या आहेत.
अपघातानंतर शिवम मिश्रा याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याच्या मागे दुसऱ्या कारमध्ये असलेल्या बाऊन्सर्सनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी जमलेल्या लोकांशी गैरवर्तन केले. यामुळे संतप्त झालेल्या जमावाने लॅम्बोर्गिनीची तोडफोड करत काचा फोडल्या आणि शिवमला कारबाहेर ओढले. अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शिवमला जमावाच्या तावडीतून सोडवले आणि जखमींसह रुग्णालयात दाखल केले. हा अपघात रविवारी दुपारी ३:१५ च्या सुमारास रेव्ह-३ मॉलजवळ घडली. व्यावसायिक के.के. मिश्रा यांचा मुलगा शिवम कार चालवत असताना त्याचे नियंत्रण सुटले आणि त्याने रस्त्याकडेच्या लोकांना आणि वाहनांना धडक दिली," अशी माहिती डीसीपी (सेंट्रल) अतुल कुमार श्रीवास्तव यांनी दिली.
अपघातग्रस्त लॅम्बोर्गिनीची किंमत १० कोटी रुपयांहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारची नोंदणी दिल्लीतील रोहिणी (आरबीओ) येथील आहे. या अपघातात आलिशान कारचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून ती सध्या पोलीस कोठडीत आहे.