Kangana Ranaut CJP Protest Pudhari
राष्ट्रीय

Kangana Ranaut: कंगना रणौतने मोदींसारखा सेल्फी व्हिडिओ केला पोस्ट; 'त्या' वक्तव्याचे केले समर्थन; सोशल मीडियावर Video Viral

Kangana Ranaut CJP Protest: CJP आंदोलनादरम्यान केलेल्या वादग्रस्त 'गटर' टिप्पणीचे कंगना रणौत यांनी व्हिडिओ शेअर करुन समर्थन केले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Kangana Ranaut CJP Protest: अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पुन्हा समर्थन केले आहे. सोशल मीडियावर टीका झाल्यानंतर त्यांनी इन्स्टाग्रामवर मोदींसारखा सेल्फी व्हिडिओ शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली.

व्हिडिओमध्ये कंगना म्हणाल्या की, आंदोलनादरम्यान काही आंदोलकांनी सार्वजनिक ठिकाणी अश्लील आणि अनैतिक वर्तन केले. अशा प्रकारचे वर्तन समाजाने कधीही स्वीकारू नये, असे त्यांचे मत आहे. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसमोर अशा प्रकारचे वर्तन करणे योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.

कंगना रणौत यांनी माध्यमांवरही टीका केली. त्यांच्या मते, त्यांनी केवळ काही आंदोलकांच्या वर्तनावर टीका केली होती, मात्र त्याचा चुकीचा अर्थ लावून त्यांच्याविरोधात वातावरण तयार करण्यात आले. त्यांनी देशातील अनेक तरुणांच्या कामाचे आपण नेहमीच कौतुक केले असल्याचा दावाही केला.

त्या पुढे म्हणाल्या की, भारतातील अनेक तरुण स्टार्टअप, शिक्षण आणि इतर क्षेत्रांत उल्लेखनीय काम करत आहेत. स्कायरूटसारख्या स्टार्टअपचे तसेच विविध क्षेत्रांत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे आपण यापूर्वी अनेकदा अभिनंदन केले आहे. त्यामुळे संपूर्ण तरुण पिढीवर टीका करण्याचा आपला हेतू नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले.

महिलांबाबत बोलताना कंगना म्हणाल्या की, समाजात शिस्त, सन्मान आणि सार्वजनिक वर्तनाला महत्त्व दिले गेले पाहिजे. काही जण समाज माध्यमांवरील प्रसिद्धीसाठी अशा प्रकारच्या वर्तनाचे समर्थन करत असल्याची टीकाही त्यांनी केली.

नेमका वाद काय आहे?

NEET पेपर लीक प्रकरणाविरोधात झालेल्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर कंगना रणौत यांनी सोशल मीडियावर काही पोस्ट केल्या होत्या. त्यामध्ये त्यांनी CJP आंदोलनाशी संबंधित काही आंदोलकांच्या वर्तनावर टीका करत वादग्रस्त शब्दांचा वापर केला होता.

अशा वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्या टीकेनंतर आता कंगना रणौत यांनी व्हिडिओद्वारे आपली भूमिका स्पष्ट करत, आपण सार्वजनिक शिस्त आणि सामाजिक मर्यादांबाबत बोललो होतो, असा दावा केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT