Kangana Ranaut
नवी दिल्ली : अभिनेत्री कंगना राणौतने हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून नवनिर्वाचित खासदार म्हणून भारतीय राजकारणात पाऊल ठेवले. खासदार म्हणून एक वर्ष झाल्यानंतर कंगनाने तिच्या प्रवासाबद्दल धक्कादायक अनुभव सांगितला आहे. एका मुलाखतीत तिने कबूल केले की तिच्या भूमिकेची वास्तविकता गंभीर आहे आणि अपेक्षेपेक्षा जास्त आव्हानात्मक आहे.
अभिनेत्री कंगना रणौतला खासदार होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. अभिनेत्री ते राजकारणी बनलेल्या कंगनाने 'टाइम्स नाऊ'ला दिलेल्या मुलाखतीत “खासदार होणं सोपं वाटलं होतं” अशी स्पष्ट कबुली दिली. हे वर्ष कठोर वास्तवाची जाणीव करून देणारे ठरल्याचे कंगनाने म्हटले. "खासदार म्हणून कामाबद्दल पहिली धारणा होती की हे काम खूप सोपे असेल. पण हे काम इतके जबाबदारीचे असेल असं मला वाटलं नव्हतं," असे तिने म्हटले आहे.
कंगनाने सांगितलं की, "जेव्हा मला ही संधी देण्यात आली, तेव्हा मला सांगण्यात आले की कदाचित तुम्हाला वर्षातून ६०-७० दिवस संसदेत उपस्थित राहावे लागेल आणि बाकीच्या वेळेत तुम्ही तुमचे काम करू शकता, मला ते अगदी सोपं वाटलं होतं. परंतु वास्तव अगदी उलट आहे,” असे ती म्हणाली.
पदभार स्वीकारल्यापासून कंगनाचा फक्त एकच चित्रपट, 'Emergency' प्रदर्शित झाला आहे. त्याचेही चित्रीकरण जुलै २०२४ पूर्वीच पूर्ण झाले होते आणि तो प्रदर्शनासाठी तयार होता. तिने इतर कोणत्याही नवीन प्रकल्पावर काम सुरू केलेले नाही, परंतु लवकरच ती पहिल्या हॉलिवूड चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशातील 'मंडी' या मतदारसंघातून निवडून आलेल्या कंगनाने मतदारसंघातील अडचणींबद्दलही सांगितले. ती म्हणाली की, अनेकदा लोक त्यांच्याकडे अशा समस्या घेऊन येतात ज्यावर त्यांचे नियंत्रण नसते, पण तरीही त्या त्यांचे प्रश्न सोडवतील असे सांगण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही.
कंगनाने असेही म्हटले, "आम्ही राज्य आणि केंद्र सरकारमधील दुवा आहोत, केंद्राकडून राज्यासाठी प्रकल्प मिळवून देण्यासाठी आणि आमच्या मतदारसंघातील समस्या व तक्रारी केंद्रासमोर मांडण्यासाठी आमची भूमिका महत्त्वाची आहे. माझ्याकडे कोणतेही कॅबिनेट किंवा प्रशासकीय यंत्रणा नाही. मी फक्त उपायुक्तांसोबत परिस्थितीचा आढावा घेऊन अभिप्राय देऊ शकते."
कंगनाच्या या वक्तव्यांनंतर टीकेची झोड उठली आहे. हिमाचल प्रदेशचे मंत्री जगत सिंह नेगी यांनी गुरुवारी म्हटले की, जर खासदार म्हणून तिला तिची जबाबदारी योग्य वाटत नसेल, तर तिने त्वरित राजीनामा द्यावा. कंगना यांनी गेल्या आठवड्यात मंडी जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी केली होती. त्या वेळी म्हटलं होत की, “मदत व पुनर्वसनचे काम राज्य सरकारने करावं लागेल. खासदार म्हणून मी फक्त पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना परिस्थितीची माहिती देऊन उदार मदतीची मागणी करू शकते.
मंडी जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये ३० जून ते १ जुलैच्या रात्री झालेली ढगफुटी, त्यानंतर आलेला पूर आणि भूस्खलनामुळे १५ जणांचा मृत्यू झाला, पाच जण जखमी झाले आणि वाहून गेलेल्या २७ बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी शोधकार्य सुरू आहे.