File Photo
राष्ट्रीय

Kailash Mansarovar Yatra| कैलास मानसरोवर यात्रा होणार ‘या’ महिन्यातः केंद्र सरकारने केली घोषणा

Kailash Mansarovar Yatra | १५ तुकड्यांमध्ये ७५० यात्रेकरु जाणार, अर्ज प्रक्रियेला सुरुवात, जून ते ऑगस्ट दरम्यान आयोजन

पुढारी वृत्तसेवा

Kailash Mansarovar Yatra

नवी दिल्ली: कैलास मानसरोवर यात्रा ३० जून ते २५ ऑगस्ट २०२५ दरम्यान आयोजित केली जाणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने शनिवारी केली. यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. १३ मे पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. यावर्षी एकूण १५ तुकड्यांमध्ये ७५० यात्रेकरु जाणार आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, प्रत्येकी ५० यात्रेकरूंच्या ५ तुकड्या उत्तराखंडमधील लिपुलेख खिंडीतून आणि प्रत्येकी ५० यात्रेकरूंच्या १० तुकड्या सिक्कीमच्या नाथू खिंडीतून प्रवास करणार आहेत. अशा प्रकारे एकूण ७५० यात्रेकरु यावर्षी यात्रेत सहभागी होणार आहेत. ऑनलाईन दाखल केलेल्या अर्जदारांमधून यात्रेकरुंची निवड केली जाणार आहे.

कैलास मानसरोवर यात्रेचा अवधी आणि खर्च किती?

उत्तराखंडमार्गे ५ तुकड्यांमध्ये २५० यात्रेकरु जाणार आहेत. यांना २२ दिवसांचा अवधी लागेल आणि प्रति व्यक्ती अंदाजे खर्च १.७४ लाख रुपये असेल. तर सिक्कीममार्गे १० तुकड्यांमध्ये ५०० यात्रेकरु जातील. त्यांना २१ दिवसांचा अवधी लागेल आणि प्रति व्यक्ती खर्च २.८३ लाख रुपये असेल, अशी माहिती यात्रेच्या संकेतस्थळावर दिली आहे.

दरम्यान, कैलास मानसरोवर यात्रा धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वासाठी ओळखली जाते. कैलास मानसरोवर चीनव्याप्त तिबेटमध्ये आहे. भारताचे परराष्ट्र मंत्रालय दरवर्षी या सहलीचे आयोजन करते. तथापि, गेल्या काही वर्षांपासून चीन भारतीयांना कैलास मानसरोवरला जाऊ देत नव्हता. दोन्ही देशांमधील सीमा वाद आणि कोविड हे याचे कारण होते. यावर्षी ही यात्रा होणार आहे. २०१५ पासून, यात्रेची अर्ज प्रक्रिया ऑनलाइन करण्यापासून ते प्रवाशांच्या निवडीपर्यंतची प्रक्रिया पूर्णपणे संगणकीकृत आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT