Jyoti Malhotra case : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप असणारी युट्यूबर ज्योती मल्होत्रा सध्या चर्चेत आहे. हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून तिची चौकशी सुरू आहे. दरम्यान, तिचे वडील हरीश मल्होत्रा यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. माझी मुलगी व्हिडीओ शूट करण्यासाठी पाकिस्तानला गेली होती. तिला पाकिस्तानमध्ये काही मित्र असतील, तर ती त्यांच्याशी संपर्क का करू शकत नाही?, असा सवाल त्यांनी केला आहे.
ज्योती मल्होत्राला रविवारी (दि.१९) पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली आणि पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला संवेदनशील माहिती दिल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली. तत्पूर्वी गुरुवारी पोलिसांनी ज्योती मल्होत्राच्या घरी जवून बॅकांचे पासबुक, लॅपटॉप आणि पासपोर्ट्स जप्त केले होते. ज्योतीच्या वडिलांनी आरोपही केला की पोलिसांनी संपूर्ण कुटुंबाचे मोबाईल जप्त केले आहेत. माझ्या मुलीने पाकिस्तानला जाण्यापूर्वी सर्व आवश्यक परवानग्या घेतल्या होत्या.ज्योती यूट्यूबसाठी व्हिडीओ शूट करण्यासाठी पाकिस्तानसह इतर ठिकाणी जात असे. तिचे तिकडे काही मित्र असतील, तर ती त्यांना फोन करू शकत नाही का?. आमची कोणतीही मागणी नाही, फक्त आमचे मोबाईल आम्हाला परत करावेत," असे हरीस मल्होत्रा यांनी 'एएनआय'शी बोलताना सांगितले.
ज्योती मल्होत्रावर दाखल झालेली एफआयआरनुसार, ज्योतीने 2023 मध्ये दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात व्हिसा अर्ज करत असताना पाकिस्तानी नागरिक एहसान-उर-रहीम (उर्फ दानिश) याच्याशी भेट घेतली होती. दानिशला भारताने हेरगिरीच्या आरोपांवरून हद्दपार केले होते. ज्योतीच्या 'ट्रॅव्हल विथ JO' या यूट्यूब चॅनलवर पाकिस्तानातील प्रवासाचे व्हिडीओ आहेत. ती दोन वेळा पाकिस्तानात गेली असल्याचे सांगितले जात आहे. अली अहवान हिच्याकडे तिने मुक्काम केला होता. तिने शाकीर आणि राणा शहबाज या गुप्तचर अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवला होता, ज्यांचा नंबर तिच्या फोनमध्ये "जट्ट रंधावा" या नावाने सेव्ह होता, असेही पोलिसांनी दाखल केलेल्या फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. ज्योतीवर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संपर्क ठेवण्याचा, तसेच पाकिस्तान उच्चायुक्तालयात दानिशसोबत प्रत्यक्ष भेटी घेण्याचा आरोप आहे.
ज्योती मल्होत्राच्या यूट्यूब चॅनलवर तिच्या पाकिस्तान भेटीशी संबंधित किमान सात व्हिडिओ आहेत. यामध्ये लाहोर व अन्य शहरातील पर्यटन क्षेत्रांचा समावेश आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ज्योतीने पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत संवेदनशील माहिती शेअर केली. भारतात पाकिस्तानची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ज्योती चार वेळा पाकिस्तानला भेट दिली होती. तिच्या राहण्याची व्यवस्था पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केली होती. पाकिस्तान उच्चायुक्तालयाने आयोजित केलेल्या रमजान इफ्तार पार्टीलाही तिने हजेरी लावली. इंस्टाग्रामवर तिने लाहोरला पाकिस्तानची सांस्कृतिक राजधानी असे वर्णन केले, जे आता तिच्या प्रोफाइलवर पिन केलेली पोस्ट आहे.
हेरगिरीच्या आरोपांनंतर दोन दिवसांनी हिसारचे पोलीस अधीक्षक शशांक कुमार सावन यांनी सांगितले होते की, ज्योती मल्होत्राने पाहीलगाम दहशतवादी हल्ल्यापूर्वी आणि त्यानंतरही पाकिस्तानात अनेक वेळा प्रवास केला होता. तिने चीनलाही प्रवास केला आहे. पाकिस्तानी गुप्तचर अधिकारी तिला मोहरा म्हणून तयार करत होते. हरियाणा पोलिसांनी केंद्रीय यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीवर आधारित ही कारवाई केली होती. हरियाणा पोलीस तिची केंद्रीय यंत्रणांच्या सहकार्याने चौकशी करत आहेत. तिचे आर्थिक व्यवहार आणि प्रवासाचा इतिहास तपासण्यात येत आहे, जेणेकरून तिच्या उत्पन्नाचा स्रोत समजू शकेल," असे एसपी सावन यांनी सांगितले.