

नाशिक : पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ या लष्करी गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली येथील कॅन्टोन्मेंटमध्ये तैनात असलेला नाईक संदीप सिंह याला पंजाबमधील पतियाळा येथून अटक करण्यात आली आहे. आपल्या मोबाईलमधून त्याने ‘आयएसआय’ला महत्त्वाची लष्करी गुपिते पुरविल्याचे आणि या बदल्यात त्याला पंधरा लाख रुपये मिळाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पतियाळा पोलिसांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
संदीप सिंह 2015 मध्ये सैन्यात भरती झाला होता. ‘आयएसआय’ला त्याने लष्कराच्या तैनातीची ठिकाणे आणि शस्त्रास्त्रांचे फोटो सोशल मीडिया व्हॉटस्अॅपवरून पाठवल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडून मिळवलेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी त्याच्या तीन मोबाईल फोनची तपासणी सुरू केली आहे.
आरोपी संदीप सिंह काही दिवसांपूर्वी पतियाळा या आपल्या मूळ गावी रजेवर गेला होता. त्याच्या कारवायांची कुणकुण लागल्यापासून पोलिस त्याच्या मागावर होते. अखेर त्याला पतियाळा येथे घरिंडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अटक करण्यात आली. सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, यापूर्वी नाशिक कॅन्टोन्मेंटमधील अमृतपाल सिंह यालाही अटक झाली होती. त्याने ‘आयएसआय’च्या सूचनेनुसार एका निर्जन ठिकाणी 2 लाख रुपये घेतले होते.
आरोपीकडून तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून, त्यांचा फॉरेन्सिक तपास सुरू आहे. पतियाळा येथे शनिवारी पत्रकार परिषद घेऊन वरिष्ठ पोलिस अधीक्षक चरणजितसिंह सोहल आणि अधीक्षक हरिंदर सिंह यांनी सांगितले की, आरोपी संदीप सिंहने गेल्या दोन वर्षांत लष्कराशी संबंधित नाशिक, जम्मू आणि पंजाबमधील अनेक लष्करी छावण्यांचे फोटो, अधिकार्यांची तैनाती व शस्त्रास्त्रांचे अनेक फोटो पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ला पाठविल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. या कामासाठी त्याला वेगवेगळ्या ठिकाणांहून पंधरा लाख रुपये मिळाले आहेत.