Jyoti Malhotra Case
नवी दिल्ली : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्यावरून हरयाणातील ब्लॉगर ज्योती मल्होत्रा हिला अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. दरम्यान, या प्रकरणात आता ओडिशातील एका महिला ब्लॉगरचेही नाव समोर येत आहे. ओडिशा येथील ट्रॅव्हल ब्लॉगर प्रियांका सेनापती हीचे नाव ज्योतीसोबत सोडले जात आहे.
प्रियांका सेनापती ही पुरी (ओडिशा) येथील रहिवासी असून ती एक युट्यूबर आहे. तिच्या 'Prii_vlogs' नावाच्या यूट्यूब चॅनेलवर सध्या 14,600 सदस्य आहेत आणि तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिला 20,000 फॉलोअर्स आहेत. ती प्रामुख्याने ओडिशा व भारतभरातील प्रवासाचे व्ह्लॉग्स पोस्ट करत असते.
प्रियांकाच्या वडिलांनी स्पष्ट केले की, “मला काहीच माहिती नव्हती. ज्योतीवर हेरगिरीचे आरोप लावले गेल्यानंतरच मला समजले. ती आमच्या घरी आलेली नव्हती, फक्त पुरीला भेट दिली होती. माझी मुलगी एक विद्यार्थिनी आहे आणि तिचा हेतू अजिबात संशयास्पद नव्हता.”
मार्च 25 रोजी प्रियांकाने एक व्हिडिओ अपलोड केला होता ज्यात ती पाकिस्तानच्या कर्तारपूर कॉरिडॉरमध्ये गेल्याचे दिसते.
प्रियांकाची आणि ज्योती मल्होत्राची यूट्यूबच्या माध्यमातून मैत्री झाली होती. ती मैत्री किती खोलवर होती आणि कर्तारपूरच्या दौऱ्यात कोणती कागदपत्रे बरोबर नेली गेली, याची चौकशी सुरू आहे.
पुरीचे पोलिस अधीक्षक विनीत अग्रवाल यांनी सांगितले की, प्रियांका सेनापतीचा तपास सर्व अंगाने सुरू आहे. तिच्या ज्योतीशी असलेल्या संबंधांबरोबरच कर्ताररपूरच्या प्रवासावरही लक्ष ठेवले जात आहे.
हा तपास अजूनही सुरू आहे आणि प्रियांका सेनापतीला सध्या अटक करण्यात आलेली नाही. ती पुरीतील तिच्या घरी राहत असून चौकशीसाठी ती सहकार्य करत आहे.
दरम्यान, ज्योतीच्या अटकेची आणि तिच्या पाकिस्तान कनेक्शनची बातमी समोर आल्यानंतर प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून स्पष्टीकरण देणारी पोस्ट शेअर केली आहे.
त्याने प्रियांकाने म्हटले आहे की, “ज्योती ही केवळ माझी यूट्यूबर मैत्रीण होती. तिच्यावर जे आरोप लावले गेले आहेत, त्याची मला कल्पना नव्हती. जर मला माहिती असते की ती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत आहे, तर मी तिच्याशी कधीच संबंध ठेवले नसते. तपास यंत्रणा मला विचारण्यासाठी संपर्क करतात, तर मी पूर्ण सहकार्य करीन. राष्ट्र सर्वोपरि आहे. जय हिंद.”
ज्योती मल्होत्रा हिला हरियाणा पोलिसांनी अटक केली आहे. तिच्यावर पाकिस्तान उच्चायोगातील एका कर्मचाऱ्याशी संपर्कात असल्याचा आरोप आहे. 13 मे रोजी भारत सरकारने संबंधित पाकिस्तानी कर्मचाऱ्याला हेरगिरीप्रकरणी देशातून हाकलले.
सध्या पोलीस पुरीमधील ज्योतीच्या हालचालींचा मागोवा घेत आहेत आणि तिचे स्थानिक कोणाशी संपर्क होते का, याचा शोध घेत आहेत.
ज्योतीने पहलगाम दौरा केला होता तसेच पाकिस्तानातही ती 2-3 वेळा जाऊन आली होती.
शिवाय पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्याशी तिचे अनैतिक संबंध होते आणि दोघांनी बाली, इंडोनेशिया येथे एकत्रित काही दिवस घालवले होते, असेही समोर आले आहे. याशिवाय हरयाणातून आणखी दोघांना हेरगिरी प्रकरणात अटक करण्यात आली आहे.