Justice Ujjal Bhuyan On Collegium System : "योग्य आणि उत्तम काम करणाऱ्या न्यायाधीशांवर ही कॉलेजियम (न्यायाधीशांची निवड करणारी न्यायाधीशांचीच समिती) यंत्रणा अन्याय करत आहे. नियुक्ती किंवा पदोन्नती न देण्याचे नेमके कारण स्पष्ट न करून कॉलेजियम न्यायव्यवस्थेची हानी करत आहे, असे परखड मत न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांनी व्यक्त केले.
'लाइव्ह लॉ'ने दिलेल्या वृत्तानुसार, एका कार्यक्रमात बोलताना न्यायमूर्ती भुयान म्हणाले, "कारण न सांगता निर्णय घेतल्यामुळे न्यायाधीशांनी खरोखरच उत्तम कामगिरी केली आहे, त्यांच्यावरच मुख्यत्वे अन्याय होतो, अशा गोपनीयतेमुळे असे लोक न्यायव्यवस्थेत प्रवेश करतात, अयोग्य टिप्पणी करतात. अशा लोकांना रोखण्यासाठी काही प्रमाणात तरी चर्चा व पारदर्शकता असायला हवी. ही पद्धत पूर्णपणे असंवैधानिक आहे. एखाद्याला रोखायचे असेल तर त्याची कारणे स्पष्ट केली पाहिजेत. कारणे जाहीर करण्यात नेमकी काय अडचण आहे?", असा सवालही त्यांनी केला.
या चर्चेत ज्येष्ठ वकील सौरभ किरपाल आणि आदित्य सोंधी हेदेखील सहभागी झाले होते. ॲड. किरपाल यांनीही स्पष्ट केले की, कारणे जाहीर केल्याने मनमानी कारभाराला चाप बसतो. यावर न्यायमूर्ती भुयान यांनीही सहमती दर्शवत, "कारण स्पष्ट केल्याने जनतेचा विश्वास वाढतो आणि माहिती मिळते," असे सांगितले.
न्यायमूर्ती भुयान यांनी कॉलेजियमच्या पारदर्शकतेवर भाष्य करताना म्हटले, "न्यायाधीशांची पदोन्नती आणि बदली यांबाबतची चर्चा अत्यंत गोपनीय ठेवली जाते. एखादी शिफारस फेटाळण्याची कारणे क्वचितच जाहीर होतात. या प्रक्रियेसाठी कोणते निकष लावले जातात, हे दर्शवणारा कोणताही अधिकृत किंवा सार्वजनिक दस्तावेज उपलब्ध नाही."
कॉलेजियम पद्धतीवर गेल्या अनेक वर्षांपासून प्रश्न उपस्थित केले जात असून, या मुद्द्यावरून न्यायव्यवस्था आणि सरकार यांच्यात सातत्याने मतभेद पाहायला मिळाले आहेत. कॉलेजियमद्वारे सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश हे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्त्या आणि बदल्यांची शिफारस करतात.