न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी आज (११ नोव्हेंबर) देशाचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली.  (Photo/@rashtrapatibhvn)
राष्ट्रीय

न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी देशाचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून घेतली शपथ

Sanjiv Khanna : नव्या सरन्यायाधीशांचा कार्यकाळ केवळ ६ महिने

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांच्या निवृत्तीनंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना (Justice Sanjiv Khanna) यांनी आज (११ नोव्हेंबर) देशाचे ५१ वे सरन्यायाधीश (51st Chief Justice of India) म्हणून शपथ घेतली. न्या. खन्ना यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ दिली. राष्ट्रपती भवन येथे झालेल्या या शपथविधी समारंभावेळी देशाचे मावळते सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड उपस्थित आहेत. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांना वकिलीचा वारसा त्यांचे वडील देवराज खन्ना यांच्याकडून मिळाला. देवराज खन्ना दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राहिले आहेत. तर संजीव खन्ना यांचे काका हंसराज खन्ना हे सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती होते. निवृत्त सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा कार्यकाळ २ वर्षांचा होता. नवे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा कार्यकाळ केवळ ६ महिने असेल. १३ मे २०२५ रोजी ते सरन्यायाधीश पदावरुन निवृत्त होतील.

तीस हजारी न्यायालय ते सर्वोच्च न्यायालय

न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी १९८३ मध्ये दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. पुढे न्यायमूर्ती खन्ना यांनी दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयातून वकिलीला सुरूवात केली. त्यानंतर ते आयकर विभाग आणि दिल्ली सरकारच्या नागरी प्रकरणांचे वकीलही होते. २००५ साली संजीव खन्ना दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले. तब्बल १३ वर्षे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राहिल्यानंतर खन्ना यांना २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून बढती मिळाली. त्यांच्याकडे संवैधानिक कायदा, कर आकारणी, लवाद, व्यावसायिक कायदा आणि पर्यावरण कायदा यासह विविध कायदेशीर क्षेत्रांतील कामाचा अनुभव आहे. न्यायमूर्ती खन्ना यांनी आयकर विभागाचे वरिष्ठ स्थायी वकील म्हणूनही काम केले आहे.

सर्वोच्च न्यायालयात ६ वर्षे काम

सर्वोच्च न्यायालयातील ६ वर्षांच्या कारकिर्दीत न्यायमूर्ती खन्ना यांनी ४०० पेक्षा अधिक न्यायपीठांचा भाग म्हणून काम केले. या वर्षी जुलैमध्ये न्यायमूर्ती खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने दिल्लीचे तत्कालिन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला होता. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचे समर्थनही त्यांनी केले होते. आतापर्यंत परंपरेनुसार सर्वोच्च न्यायालयातील अनुभवाच्या आधारे सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती सरन्यायाधीश बनतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT