Rajya Sabha ruckus : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात नीट (NEET) पेपर फुटी आणि दिल्लीतील जंतर-मंतरवर निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईवरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत गदारोळ सुरूच आहे.आज (दि.29) राज्यसभेत सभागृह नेते आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा व विरोधी पक्षनेते तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. खरगे यांनी जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्यावरून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला, तर नड्डा यांनी सरकारचा बचाव करत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची कारवाई पूर्णपणे योग्य असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना सक्रिय राजकारण किंवा आंदोलने (ॲक्टिव्हिझम) करायचे आहे, त्यांनी अशा प्रकारच्या कारवाईला सामोरे जाण्यास तयार राहिले पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला.
राज्यसभेतील चर्चेदरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पोलिसांच्या कारवाईचा तीव्र निषेध करत 'स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया'च्या (SFI) विद्यार्थ्यांच्या अटकेचा मुद्दा उपस्थित केला. याआधी सीपीआय (एम) चे राज्यसभा खासदार जॉन ब्रिटास यांनी पोलिसांनी एसएफआयच्या आयशी घोष यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. यावरून सरकारवर घणाघात करताना खरगे म्हणाले की, आज लोकशाही धोक्यात आली आहे.
"ब्रिटास यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे तो अत्यंत लाजीरवाणा आहे. एखाद्या राष्ट्रीय पक्षाच्या कार्यालयात घुसून कोणाला अटक करण्याची भाषा केली जात असेल, तर ही लोकशाही धोक्यात आल्याचे लक्षण नाही का?" असा सवाल खरगे यांनी केला. तसेच तिथे गेलेल्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
खर्गे यांच्या या वक्तव्यानंतर राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. त्यानंतर केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी उभे राहून खरगे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. नड्डा म्हणाले की, " मी स्वतः विद्यार्थी असताना अनेक आंदोलनांत सहभाग घेतला आहे. आंदोलनात सहभागी झाल्याने मलाही अनेकदा अटक करण्यात आली होती. आंदोलक झाला तर तुरुंगात जावेच लागेल.विद्यार्थ्यांना सक्रिय राजकारण किंवा आंदोलने (ॲक्टिव्हिझम) करायचे आहे, त्यांनी अशा प्रकारच्या कारवाईला सामोरे जाण्यास तयार राहिले पाहिजे."