Indian Techies Reddit Post Viral:
सोशल मीडियावर सध्या एक Reddit post चांगलीच व्हायरल होत आहे. यात एका भारतीय टेकीनं आपली सध्या काय स्थिती आहे आणि आपण कसं सात महिन्यापासून बेरोजगार आहोत हे सांगितलं आहे. हा भारतातील टेकी आयआयटीमधून पासआऊट झाला होता. त्याला त्याच्या कामाचा १८ वर्षाचा अनुभव आहे. तो सात महिन्यापूर्वी निफ्टी५० मधील एका कंपनीत मॅनेजर पदावर काम करत होता. त्याला वर्षाला ७० लाख रूपयाचं पॅकेज होतं.
मात्र सात महिन्यापूर्वी त्याला या कंपनीनं रिस्ट्रक्चरिंगचं कारण देऊन कामावरून काढून टाकलं. तिथून पुढं या आयआयटी पासआऊट टेकीचं आयुष्यच बदलून गेलं आहे. ज्यावेळी कंपनीनं त्याला कामावरून काढून टाकलं त्यावेळी त्याला दोन महिन्याचा पगार देण्यात आला.
त्याच टेकीनं आता Reddit वर पोस्ट केली आहे. तो गेल्या सात महिन्यांपासून बेरोजगार आहे. तो आपल्या पोस्टमध्ये म्हणतो की मी संभाव्य नोकरीचा प्रत्येक संधी धुंडाळून पाहिली. प्रत्येक जॉब पोर्टलच्या प्लॅटफॉर्मवर सर्च केलं मात्र मला नोकरी काही मिळाली नाही.
तो टेकी लिहितो की, 'मी लिंक्डइन, नौकरी, रेफरन्स आणि कंसल्टंट या सर्व पर्यांयांची साचपणी केली. एवढंच काय यांची प्रीमियम सर्व्हिस देखील घेतली. दुर्दैवानं मला साधा कोणाचा कॉल देखील आला नाही. गेल्या सात महिन्यात मला कंसल्टन्टकडून एखादुसरा कॉल आला. मला फक्त दोन इंटरव्ह्यू मिळाले.'
या पोजिशनला माझे मित्र देखील मला फारशी मदत करू शकत नाहीयेत. कारण जॉब ऑपनिंगच खूप कमी आहेत. मी कमी पगारावर देखील काम करण्यास तयार आहे. मात्र तरी देखील मला नोकरीबाबतचे कॉल येत नाहीयेत. यामुळे मी उद्ध्वस्त होत आहे. मी निराशावादी झालो आहे.'
या टेकीनं सांगितलं की त्यानं घर घेतलं होतं. मात्र त्या घराचे हप्ते फेडण्यात अडचण येऊ लागल्यामुळं ते घर मी भाड्यानं दिलं आहे.
दरम्यन, या पोस्टनंतर भारतातील अनुभवी वर्कफोर्स एका वेगळ्याच समस्येला तोंड देत आहे का याची चर्चा सुरू झाली आहे. अनेक जाणकारांच्या मते सध्याचं जॉब मार्केट हे खूप निर्दयी झालं आहे. अनुभवी वर्कफोर्सला तरूणांशी स्पर्धा करावी लागत आहे.
तज्ज्ञ धर्मेश बा म्हणतात की, 'सध्याचं हायरिंग मार्केट खूप विचित्र झालं आहे. मी UX designer च्या शोधात होतो. मात्र मला अशा अनेक प्रोफाईल मिळाल्या की ज्या अपेक्षेपेक्षा कमी प्रतीच्या आहे. मी जेवढे डिझाईन पाहिले आणि त्यांचे स्कील पाहिले ते हळूहळू कालबाह्य होत आहेत. मात्र २०२१ च्या बूममुळे त्यांचे पगार हे खूपच जास्त फुगलेले आहेत.
ते पुढे म्हणाले की, 'मी पाहतोय की युवा तरूण लोकं खूप चांगलं काम करत आहेत. त्यांच्याकडे पॅशन आहे.'