Jammu and Kashmir news
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील सिधरा येथे रविवारी एका सहा वर्षाच्या मुलाला खेळताना कचऱ्यामध्ये चीनी बनावटीची शस्त्रावर बसवली जाणारी दुर्बीण सापडली. याबाबत मुलाच्या कुटुंबियांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीसांनी दुर्बीण जप्त केली असून हे उपकरण या परिसरात कसे आले, याचा तपास सुरु केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, जम्मू (ग्रामीण) पोलिसांनी सिधरा भागातून शस्त्रावर बसवता येणारी एक दुर्बीण जप्त केली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. सिधरा येथील असराराबाद भागातील सहा वर्षांच्या मुलाकडे हे उपकरण सापडले. चौकशी दरम्यान, मुलाच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की, रविवारी सकाळी घरासमोरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून मुलाने ही वस्तू उचलून आणली होती.
हे उपकरण या परिसरात कसे आले, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी चौकशीसाठी सांबा जिल्ह्यातून एका २४ वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.
दुसऱ्या एका घटनेत, सांबा जिल्ह्यातील दियानी गावातून तन्वीर अहमद नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या मोबाईलमध्ये पाकिस्तानी फोन नंबर आढळल्याचा आरोप आहे. तन्वीर हा दक्षिण काश्मीरमधील अनंतनागचा रहिवासी असून सध्या सांबामध्ये राहत होता.
रविवारीच घडलेल्या अन्य एका घटनेत, उधमपूर जिल्ह्यात दहशतवाद्यांनी एका घरातून जेवण घेऊन जंगलात पळ काढला. यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम राबवली. मात्र त्यापूर्वीच दहशतवादी पसार झाले होते. या घटनेनंतर परिसरात नाकेबंदी करून शोध मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.