Jharkhand HIV cases Jharkhand HIV cases
राष्ट्रीय

Jharkhand HIV cases: भयंकर निष्काळजीपणा! सरकारी रूग्णालयात ५ अल्पवयीन मुलांना चढवलं HIV पॉझिटिव्ह रक्त

thalassemia children HIV: थॅलेसेमियाग्रस्त पाच अल्पवयीन मुलांना रक्त चढवल्यानंतर एचआयव्हीची लागण झाल्याचे उघड झाले आहे.

मोहन कारंडे

Jharkhand HIV cases

चाईबासा : एका सरकारी रुग्णालयात वैद्यकीय निष्काळजीपणाचा एक अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. थॅलेसेमियाग्रस्त पाच अल्पवयीन मुलांना रक्त चढवल्यानंतर एचआयव्हीची लागण झाल्याचे उघड झाले आहे. झारखंडमधील पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील चाईबासा येथील सरकारी रुग्णालयातील हा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. झारखंड उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली असून आरोग्य विभागाला उच्च-स्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

दूषित रक्त दिल्याचा आरोप

१३ सप्टेंबर रोजी रक्तसंक्रमण झालेल्या सात वर्षीय थॅलेसेमियाग्रस्त मुलाची १८ ऑक्टोबर रोजी पुढील तपासणी केली असता, तो एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळला. मुलाच्या वडिलांनी रक्तपेढीत त्यांच्या मुलाला एचआयव्ही-संक्रमित रक्त देण्यात आल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर झारखंड सरकारने तातडीने दखल घेतली आणि आरोग्य सेवा संचालक डॉ. दिनेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय वैद्यकीय पथकाला चौकशीसाठी पाठवले.

तपासणीत आणखी ४ बालकांना लागण

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन झारखंड राज्य एड्स नियंत्रण सोसायटीचे (JSACS) पथक, आरोग्य सेवा संचालक डॉ. दिनेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली, २५ ऑक्टोबर रोजी चाईबासा येथे पोहोचले. त्यांनी केलेल्या तपासणीत आणखी चार मुले एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळली. यामुळे बाधित मुलांची एकूण संख्या पाच झाली आहे. या सर्व मुलांना थॅलेसेमियामुळे दर १५ ते ३० दिवसांनी रक्ताची गरज भासत होती आणि त्यांना अनेक वर्षांपासून रक्तसंक्रमण केले जात होते.

वेगवेगळ्या रक्तदात्यांकडून संसर्ग?

जिल्हा उपायुक्त चंदन कुमार यांनी सांगितले की, नुकत्याच किटद्वारे केलेल्या तपासणीत ही पाच प्रकरणे उघड झाली, ज्यांची यापूर्वी चाचणी झालेली नव्हती. प्रशासनाने तातडीने पुढील चाचण्यांद्वारे रक्तदात्यांचा डेटा तपासणे आणि एचआयव्ही पॉझिटिव्ह रक्तदात्यामुळे संसर्ग झाला आहे का, याची पडताळणी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, या पाचही मुलांचे रक्तगट वेगवेगळे असल्याने, संसर्ग एकाच नव्हे तर वेगवेगळ्या रक्तदात्यांकडून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT