crime news file photo
राष्ट्रीय

Crime News: १६ वर्षीय मुलीला मुंबईत १ लाखात विकले, जबरदस्तीने लग्न आणि शारीरिक छळ; ६ वर्षांनंतर तस्करांच्या तावडीतून सुटका

सहा वर्षांपूर्वी मानवी तस्करीला बळी पडलेल्या झारखंडमधील एका तरुणीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Human Trafficking Rescue

नवी दिल्ली: सहा वर्षांपूर्वी मानवी तस्करीला बळी पडलेल्या झारखंडमधील एका तरुणीची दिल्लीतील रोहिणी भागातून सुखरूप सुटका करण्यात आली आहे. घटना घडली तेव्हा ही मुलगी अवघ्या १६ वर्षांची होती. तस्करांनी तिला झारखंडमधून आधी दिल्लीला आणि त्यानंतर मुंबईला नेले. तिथे तिला १ लाख रुपयांना विकण्यात आले.

तस्करांनी तिची विक्री करण्यापूर्वी तिचे वय जास्त दाखवण्यासाठी तिच्या आधार कार्डवरील जन्मतारीख बदलली होती. त्यानंतर मुंबईत तिचे जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आले. झारखंड पोलीस आणि दिल्ली पोलीस यांनी एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने ही संयुक्त कारवाई करत मुलीची सुटका केली, अशी माहिती पश्चिम सिंगभूमचे पोलीस अधीक्षक अमित रेणू यांनी दिली.

पोलीस सध्या पीडित तरुणीला रांची येथे परत आणत आहेत. तिथे तिच्या चौकशीनंतर या संपूर्ण रॅकेटचा आणि त्यामागील एजंट्सचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.

आमिष दाखवून दिल्लीला नेले

पोलीस चौकशीदरम्यान पीडितेने आपली आपबिती सांगितली. ती लहान असताना तस्करांनी तिला आमिष दाखवून झारखंडहून दिल्लीला आणले होते. दिल्लीत तिच्याकडून जबरदस्तीने घरकाम करून घेण्यात आले. त्यानंतर तिला मुंबईला नेऊन १ लाख रुपयांना विकले आणि तिचे जबरदस्तीने लग्न लावून दिले.

शारीरिक अन् मानसिक छळ

लग्नानंतर तिला पुन्हा दिल्लीला आणण्यात आले. या काळात तिला तीव्र शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागले. पोलीस आता या प्रकरणाचा तपास मानवी तस्करी, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि फसवणुकीच्या कायद्यांतर्गत करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT