स्पर्धा परीक्षांमधील अनियमिततेविरुद्ध विद्यार्थी आंदोलन करत असलेल्या रांचीमधील जयपाल सिंग मुंडा स्टेडियमवर विद्यार्थी एकवटले आहेत. Pudhari
राष्ट्रीय

JPSC Paper Leak : पेपरफुटीविरोधात पुन्‍हा आंदोलन, CJP चा पाठिंबा; झारखंडमध्ये विद्यार्थी उपोषणाला का बसले आहेत?

स्‍पर्धा परीक्षेमधील अनियमिततेविरुद्ध जयपाल सिंह मुंडा स्टेडियमवर विद्यार्थी एकवटले

पुढारी वृत्तसेवा

Jharkhand JPSC Paper Leak : झारखंडमधील विविध भरती परीक्षांमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहाराविरोधात विद्यार्थ्यांचे सुरु असणारे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. १४ व्या झारखंड लोकसेवा आयोगाच्‍या (JPSC) पूर्व परीक्षेचे (Preliminary Test) पेपरफुटीची चौकशी आणि राज्य परीक्षा पद्धतीत व्यापक सुधारणांच्या मागणीसाठी एका विद्यार्थी नेत्याने बेमुदत उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, 'कॉकरोच जनता पार्टी'ने (CJP) या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने रांचीतील या आंदोलनाला आणखी बळ मिळाले आहे.

जयपाल सिंह मुंडा स्टेडियमवर विद्यार्थी एकवटले

स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेविरुद्ध विद्यार्थी आंदोलन करत असलेल्या रांचीमधील जयपाल सिंग मुंडा स्टेडियमवर, विद्यार्थी नेते देवेंद्र नाथ महतो यांनी रविवारी (दि. २ऑगस्‍ट) बेमुदत उपोषण सुरू केल आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याकडे मांडलेल्या मागण्या मान्य होईपर्यंत हे उपोषण मागे घेणार नाही, असा इशारा महतो यांनी दिला आहे.

विद्यार्थींचा नेमका आक्षेप काय?

वृत्तसंस्‍था 'एएनआय'शी बोलताना देवेंद्र नाथ महतो यांनी सांगितले की, "५ जुलै रोजी आम्ही आंदोलनाला सुरुवात केली. ७ जुलै रोजी राज्यपालांची भेट घेतली, तर ८ जुलै रोजी प्रतिकात्‍मक पुतळा दहन आंदोलन केले. २० जुलै रोजी मुख्यमंत्र्यांना भेटून पुरावे सादर केले, ज्यानंतर अधिकृत कारवाईला गती मिळाली. मात्र, महिनाभर उलटूनही राज्य सरकार आणि आयोग विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नाही. विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी आणि हा लढा तीव्र करण्यासाठी बेमुदत उपोषण सूरु केले आहे."

विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत?

१९ एप्रिल रोजी घेण्यात आलेली १४ वी JPSC नागरी सेवा पूर्व परीक्षेचा पेपरफुटी झाली आहे त्‍यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात यावी. तसेच या परीक्षांमधील गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. TDPL कंपनीच्या सर्व परीक्षांची चौकशी: 'ब्लॅकलिस्टेड' टीडीपीएल (TDPL) एजन्सीद्वारे आयोजित सर्व परीक्षांची फेरतपासणी व समीक्षा व्हावी.OMR उत्तरपत्रिकेत अनुत्तरित प्रश्नांसाठी (Not Attempted) पाचवा पर्याय समाविष्ट केला जावा, आदी मागण्‍या केल्‍या आहेत.

विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट

गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत आहेत. रांचीमध्ये विद्यार्थ्यांनी भव्य 'मशाल मार्च' काढून आपला रोष व्यक्त केला."JPSC असो वा JSSC CGL, प्रत्येक परीक्षेचे पेपर लीक होत आहेत. OMR शीट व्हायरल झाल्यानंतरच सरकारला जाग आली," असा आरोप आंदोलक विद्यार्थिनी रेखा राणा आणि अर्चना कुमारी यांनी केला आहे. केवळ वरवरची प्रशासकीय कारवाई न करता संपूर्ण यंत्रणेत मूलभूत सुधारणा आणि पारदर्शकता आणण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

कॉकरोच जनता पार्टीचा आंदोलनाला पाठिंबा

आंदोलनाला कॉकरोच जनता पार्टी (CJP) कडून पाठिंबा मिळाला आहे. CJP चे संस्थापक अभिजित दीपके यांनी एक्स (ट्विटर) वर पोस्ट करत म्हटले, "झारखंडमध्ये परीक्षांमधील धांदलीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी मी चर्चा केली आहे. CJP विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे." दरम्‍यान, भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेश सरचिटणीस अमर कुमार बाउरी यांनी परीक्षांमधील कथित गैरव्यवहारावरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी बाउरी यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT