Jharkhand High Court file photo
राष्ट्रीय

High Court: पत्नीवर विवाहबाह्य संबंध स्वीकारण्यासाठी दबाव आणणे म्हणजे मानसिक छळ : उच्च न्यायालय

पतीचे अनैतिक संबंध असलेल्या स्त्रीला पत्नीने 'छोटी बहीण' मानून स्वीकारलेच पाहिजे, असा दबाव टाकणे हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा मानसिक छळ असल्याचे झारखंड उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

मोहन कारंडे

High Court

रांची: पतीचे अनैतीक संबंध असलेल्या स्त्रीला पत्नीने 'छोटी बहीण' मानून स्वीकारलेच पाहिजे, असा दबाव टाकणे हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा मानसिक छळ असल्याचे झारखंड उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. एका डॉक्टर दाम्पत्याच्या घटस्फोटाच्या प्रकरणात सुनावणी करताना न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्वाळा दिला असून, परस्पर विश्वासाशिवाय विवाह टिकू शकत नाही असे नमूद करत उच्च न्यायालयाने हा विवाह रद्दबातल ठरवला आहे.

न्यायमूर्ती सुजीत नारायण प्रसाद आणि न्यायमूर्ती प्रदीप कुमार श्रीवास्तव यांच्या खंडपीठाने कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय फेटाळून लावत हा निकाल दिला. पती-पत्नीमधील नाते हे एकमेकांवरील विश्वास आणि आदरावर टिकून असते. जर हा विश्वासच तुटला, तर तो पुन्हा निर्माण करता येत नाही, कारण विश्वास हाच विवाहाचा पाया असतो, असे न्यायालयाने म्हटले.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

हे पती-पत्नी दोघेही व्यवसायाने डॉक्टर आहेत. फेब्रुवारी २०१८ मध्ये त्यांचा विवाह झाला होता आणि ते धनबाद येथे राहत होते. पती 'टुंडी प्राथमिक आरोग्य केंद्रा'त कार्यरत होता, तर पत्नी 'भारत कोकिंग कोल लिमिटेड' मध्ये काम करत होती. सप्टेंबर २०१९ पासून हे जोडपे वेगळे राहत होते.

पत्नीने आरोप केला होता की, पतीचे एका विधवा महिलेशी अनैतिक संबंध सुरू आहेत. कुटुंबाच्या मध्यस्थीनंतर पतीने हे संबंध संपवण्याचे लेखी आश्वासनही दिले होते. मात्र, त्यानंतरही त्याचे संबंध सुरूच राहिले. पत्नीने याला विरोध केल्यावर पतीने तिला बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे पत्नीला 'स्लिप-डिस्क' आणि 'ट्रॉमेटिक ऑस्टियोआर्थराइटिस' सारख्या गंभीर आजार जडले.

दुसरीकडे, पतीने पत्नीचे सर्व आरोप फेटाळून लावत पत्नीच्या वडिलांच्या क्लिनिकमधील वैद्यकीय कागदपत्रे बनावट असल्याचा दावा केला होता. तसेच, जानेवारी २०२३ मध्ये त्याने 'वैवाहिक हक्कांच्या पुनर्स्थापनेसाठी' एकतर्फी आदेशही मिळवला होता.

मात्र, उच्च न्यायालयाने पतीचा युक्तिवाद फेटाळून लावत स्पष्ट केले की, कागदपत्रे पत्नीच्या वडिलांच्या क्लिनिकमधील आहेत म्हणून ती केवळ गृहीतकावर खोट ठरवता येणार नाहीत. पतीच्याच उद्धट आणि जाचक वागणुकीमुळे पत्नीला आपले सासर सोडण्यास भाग पाडले गेले, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने हा विवाह अधिकृतपणे मोडीत काढला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT