झारखंड विधानसभा निवडणुकीत दोन्ही प्रमुख आघाड्यांमध्ये समान स्पर्धा आहे.  File Photo
राष्ट्रीय

झारखंड विधानसभा निवडणूक: दोन्ही प्रमुख आघाड्यांमध्ये समान स्पर्धा

Jharkhand Assembly Election 2024 | पहिल्या टप्प्यात १३ नोव्हेंबरला ४३ जागांसाठी निवडणूक

पुढारी वृत्तसेवा
उमेश कुमार

नवी दिल्ली : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या (Jharkhand Assembly Election 2024) | पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रचार आज (सोमवारी) संपला. पहिल्या टप्प्यात १३ नोव्हेंबरला ४३ जागांसाठी निवडणूक होणार आहे. उर्वरित ३८ जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात २० नोव्हेंबररोजी मतदान होणार आहे. यावेळी या निवडणुकांमध्ये इंडिया आणि एनडीए आघाडी यांच्यात आमने-सामने लढत होत आहे. दहा दिवसांपूर्वीपर्यंत या निवडणुकीत इंडिया आघाडीचा वरचष्मा मानला जात होता. मात्र, निवडणुकीच्या प्रचाराला जसजसा वेग आला आणि भाजपचे ज्येष्ठ नेते प्रचारासाठी सज्ज झाले, तसतसा निवडणुकीचा कल बदलू लागला.

झारखंड (Jharkhand Assembly Election 2024) हे प्रामुख्याने पलामू, उत्तर आणि दक्षिण छोटानागपूर, कोल्हान आणि संथाल परगणा विभागात विभागलेले आहे. यामध्ये संथाल परगणा परिसर हा पूर्णपणे आदिवासी क्षेत्र मानला जातो. जो नेहमीच झामुमोच्या ताब्यात राहिला आहे. राज्यात आदिवासींसाठी २८ जागा राखीव आहेत. ज्यामध्ये झामुमोने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत २६ जागा जिंकल्या होत्या. तर कोल्हानही झामुमोचा बालेकिल्ला म्हटले जाते. मात्र, झामुमोच्या बड्या नेत्यांना फोडून भाजपने या भागात शिरकाव करण्याचा प्रयत्न केला आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन हे कोल्हान परिसरातून येतात. मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. एवढेच नाही, तर भाजपने हेमंत सोरेन यांच्या वहिणी सीता सोरेन यांचा पक्षात समावेश करून झामुमो कमकुवत करण्याचे काम केले आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांच्या पत्नी गीता कोडा यांना पक्षाचा भाग बनवून भाजपने झामुमोच्या बालेकिल्ल्यातही धुमाकूळ घातला आहे.

दक्षिण छोटानागपूर विभाग हा एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, २०१९ मध्ये झामुमो-काँग्रेसने हा बालेकिल्ला फोडला. या विभागातील १५ जागांपैकी ९ जागा जिंकून भाजपला केवळ पाच जागांवर रोखले. उत्तर छोटानागपूर विभागाबाबत बोलायचे झाले. तर, येथे भाजपची कायमच आघाडी आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत या विभागातील २५ पैकी १३ जागा काबीज करण्यात भाजपला यश आले होते. पलामू विभागात डाल्टनगंज, विश्रामपूर, छत्तरपूर, भवनाथपूर आणि पंकी या जागा भाजपकडे आहेत. तर गढवा आणि लातेहार या जागा झामुमोच्या ताब्यात आहेत. मनिका ही जागा काँग्रेसकडे, तर हुसेनाबादची जागा राष्ट्रवादीकडे (अजित पवार गट) आहे. येथे छतरपूर आणि विश्रामपूर या दोन जागांवर काँग्रेस आणि राजद यांच्यात मैत्रीपूर्ण लढत आहे. (Jharkhand Assembly Election 2024)

भाजपचा आक्रमक तर काँग्रेसचा प्रचार 'हेमंत भरोसे'

झारखंडमध्ये भाजपने आक्रमक प्रचार केला आहे. भाजपचे आसामचे मुख्यमंत्री हेमंता विश्वा शर्मा आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान सातत्याने राज्यात तळ ठोकून आहेत. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह यांच्यासह अनेक मंत्र्यांनी प्रचार केला आहे. दुसरीकडे इंडिया आघाडीत फक्त झामुमोचा प्रचार करा किंवा मरो अशा स्थितीत आहे. काँग्रेस येथे पूर्णपणे हेमंत सोरेन यांच्यावर अवलंबून आहे. काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणुकीसाठी आतापर्यंत केवळ दोनदाच राज्याचा दौरा केला आहे. तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे एकदाच निवडणूक प्रचारासाठी गेले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT