Shocking Crime News: २७ वर्षाच्या महिला बँक कर्मचाऱ्याचा बहादूरगड इथं गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. झज्जर जिल्ह्यातील या घटनेनं सगळ्यांनाच धक्का बसला होता. आधी या प्रकरणात चोरी अन् खून असा अँगल दिसत होता. मात्र पोलिसांना वेगळीच शंका आली. त्यांनी तपासाची चक्रे वेगानं फिरवली अन् अवघ्या १८ तासात या प्रकरणाचा छडा लावला.
महक या गुरूग्राममधील एचडीएफसी बँकेत काम करतो होत्या. त्यांचे लग्न अंशुल धवन यांच्यासोबत झाले होते. अंशुल धवन हे चार्टर्ड अकाऊंटट आहेत. ते हिस्सारमधील सेक्टर १४ मध्ये राहतात. त्यांनी महक यांच्यासोबत २५ सप्टेंबर २०२५ रोजी अरेंज मॅरेज केलं होतं. या जोडप्याच्या लग्नाला अवघे ५ महिने झाले होते.
दरम्यान, लग्नानंतर आपल्या पहिल्या व्हॅलेंटाईन डे दिवशी म्हणजे १४ फेब्रुवारी रोजी हे जोडपं हिस्सारमध्ये आलं होतं. त्यांनी कुटुंबासोबत वेळ घालवला. दुसऱ्यादिवशी संध्याकाळी म्हणजे १५ फेब्रुवारी रोजी हे जोडपं महक यांच्या माहेरी गुरूग्राममधील हंसी इथं गेलं. मात्र चार तासानं अंशुलचा पोलिसांना फोन आला. त्यावेळी त्यानं पहसुर गावाजवळ काही अज्ञात हल्लेखोरांनी आमच्या गाडीजवळ हल्ला केला आणि माझ्या पत्नाचा खून करून ते पळून गेले असं सांगितलं.
पोलीस घटनास्थळी पोहचले, त्यांना तिथं गाडीच्या बाहेर महकचा मृतदेह आढळला. हा मृतदेह डर्ट ट्रॅकवर जवळपास १०० मीटरवर सापडला होता. महक यांचा गळा चिरण्यात आला होता. याबाबत पोलिसांनी चौकशी करण्यास सुरूवात केली त्यावेळी अंशुल यांनी दिलेली माहिती पोलिसांना खटकू लागली. त्याला हल्लेखोरांचे वर्णन करता येत नव्हते आणि तो सतत आपले वक्तव्य बदलत देखील होता.
दरम्यान, पोलिसांनी अंशुलची आपल्या खास शैलीत चौकशी केली. त्यांनी अंशुलला घटना घडली त्यावेळीचा सीन पुन्हा रिकन्स्ट्रक्ट करायला सांगितलं त्यावेळी अंशुलनं त्यानेच महकचा गळा चिरला असल्याचा कबुली दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महकच्या चारित्र्यावरून सतत या दोघांमध्ये वाद होत होते. ज्यावेळी ते लाँग ड्राईव्हवर गेले होते त्यावेळी देखील त्यांचा याबाबत वाद झाला. तो टोकाला पोहचला.
या वादातूनच अंशुलनं महकचा खून केला. त्यानं आधी तिचा गळा आवळला. त्यानंतर कात्रीनं तिचा गळा चिरला. हे काम करताना त्यानं ग्लोव्हज् देखील घातले होते. त्याला कोणताच पुरावा ठेवायचा नव्हता. त्यानंतर चोरीचा प्रकार क्रिएट करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, महकचे वडील कृष्णा कठुरिया यांना देखील आपल्या जावयावर संशय होता. कुटुंबीयांनी महक गरोदर होती अशी देखील माहिती दिली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढचा तपास सुरू केला आहे.