राष्ट्रीय

JEE Main Exam : जेईई मुख्य परीक्षेत गडबड; सीबीआयचे दिल्ली, पुण्यासह देशभरात १९ ठिकाणी छापे

backup backup
नवी दिल्ली पुढारी वृत्तसेवा, : वर्ष 2021 सालच्या जेईई (संयुक्त प्रवेश परीक्षा) मुख्य परीक्षेत झालेल्या गडबडीप्रकरणी सीबीआयने देशाची राजधानी दिल्लीसह पुणे, जमशेदपूर, इंदोर, बंगळुरू अशा १९ ठिकाणी शनिवारी छापे टाकले. सीबीआय प्रवक्त्याकडून ही माहिती देण्यात आली आहे. यासंदर्भात घोटाळ्याचा मास्टरमाईंड समजल्या जाणाऱ्या विनय दहिया नावाच्या आरोपीस गुरुग्राम येथून अटक करण्यात आली आहे. दहिया हा गेल्या वर्षभरापासून फरार होता.
सीबीआयने छापेमारी करीत 25 लॅपटॉप, 7 डेस्कटॉप कॉम्प्युटर्स, पोस्ट डेटेड चेक्स, आक्षेपार्ह कागदपत्रे, असंख्य विद्यार्थ्यांची दहावी, बारावीची गुणपत्रके ताब्यात घेतली आहेत. याबाबत अनेक संशयितांची चौकशी सुरू असल्याचे सीबीआय सूत्रांकडून सांगण्यात आले. जेईई मुख्य परीक्षा घोटाळ्याप्रकरणी गेल्या सप्टेंबर महिन्यात सीबीआयने ऍफिनिटी एज्युकेशन प्रा. लि. आणि या कंपनीच्या सिद्धार्थ कृष्णा, विश्वंभर त्रिपाठी व व्ही. गोविंद नावाच्या तीन संचालकांविरोधात गुन्हे नोंदवले होता.
आरोपींनी दलालांच्या मदतीने जेईई मुख्य परीक्षेत गडबड केली होती. ऑनलाईन परीक्षेदरम्यान रिमोट ऍक्सेसच्या माध्यमातून ही गडबड करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना आमिष दाखवून त्या बदल्यात पैसे घेण्यात आले होते. आरोपींकडे देशाच्या विविध भागांतील विद्यार्थ्यांचे दहावी तसेच बारावीचे गुणपत्रक, परीक्षेचे युजर आयडी, पासवर्ड, पोस्ट डेटेड चेक्स सापडले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याकडून 12 ते 15 लाख रुपयांचे पोस्ट डेटेड चेक घेण्यात आले होते. विद्यार्थ्यांना नामांकित संस्थेत प्रवेश मिळाल्यानंतर हे चेक वठविले जाणार होते, असे सीबीआय प्रवक्त्याकडून सांगण्यात आले.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT