Gujarat Crime News AI-generated image
राष्ट्रीय

Crime News : प्रियकराच्या मदतीने दारूमधून विष देऊन पतीचा 'गेम'; १५ फूट खोल गाडलेला मृतदेह पाहून पोलीसही हादरले!

तब्बल दोन वर्षांनंतर भावाच्या संशयामुळे तरुणाच्या खुनाचे गूढ उलगडले

पुढारी वृत्तसेवा

Gujarat Crime News : गुजरातच्या जामनगरमध्ये दोन वर्षांपूर्वी गायब झालेल्या तरुणाच्या हत्येचा एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक पर्दाफाश झाला आहे. अनैतिक संबंधांच्या काट्यातून स्वतःच्याच पतीची विष देऊन हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीला दारूत विष मिसळून पाजले आणि त्यानंतर त्याचा मृतदेह एका कारखान्यात १५ फूट खोल खड्ड्यात पुरून टाकला. या भयंकर हत्याकांडाप्रकरणी पोलिसांनी मृत तरुणाची पत्नी आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.

दोन वर्षांपासून पती बेपत्ता

जिग्नेश मावदीया हा बेपत्ता झाला आहे, अशी तक्रार दोन वर्षांपूर्वी जामनगरच्या सिटी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तांत्रिक आणि गुप्त पद्धतीने तपास सुरू केला. मात्र जिग्नेशचा ठावठिकाणा मिळाला नाही. तब्‍बल दोन वर्ष जिग्नेशचा ठावठिकाणा मिळाला नाही. मात्र काही दिवसांपूर्वी जिग्नेशच्‍या भावाने संशय व्‍यक्‍त केला आहे. अनैतिक संबंधातून पत्‍नीने जिग्नेशचा काटा काढण्याचा भयंकर कट रचला असल्‍याचे उघडकीस आले.

दारूत विष कालवून पाजले!

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश हा जिग्नेशच्या घरी मद्यप्राशन करण्यासाठी आला. यावेळी पृथ्वीच्या मदतीने त्याने जिग्नेशच्या दारूत सायनाइड मिसळले. मद्य प्राशन करताच जिग्नेशचा जागीच मृत्यू झाला.

भाड्याच्या कारखान्यात १५ फूट खड्डा खोदून मृतदेह पुरला

जिग्नेशचा खून केल्यानंतर हत्येचा कोणताही पुरावा मागे राहू नये यासाठी, आरोपींनी मृतदेह दरेड परिसरातील एका भाड्याने घेतलेल्या कारखान्यात नेला. तेथे १२ ते १५ फूट खोल खड्डा खोदून मृतदेह पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

पती ऑस्ट्रेलियात गेला असल्याचा पत्नीचा बनाव

पतीची निर्घृण हत्या केल्यानंतर पत्नी पृथ्वीने कुटुंबाला तब्बल दोन वर्षे अंधारात ठेवले. "जिग्नेश ऑस्ट्रेलियात नोकरीसाठी गेला आहे आणि तो ज्या कंपनीत काम करतो तिथे मोबाईल वापरण्यास बंदी आहे," अशी खोटी माहिती देऊन ती नातेवाईकांची दिशाभूल करत राहिली.

खुनाचे गूढ कसे उलगडले?

काही दिवसांपूर्वी मृत जिग्नेशचा भाऊ अशोक मावदीया याने जिग्नेशबरोबर फोनवर बोलायचे आहे, असे पत्नी पृथ्वीला सांगितले. मात्र ती टाळाटाळ करू लागली. अशोकने थेट पोलिसांत जाण्याचा इशारा दिला. या धमकीमुळे आरोपी पत्नी घाबरली आणि तिच्या चेहऱ्यावरील भीती पाहून पोलिसांचा संशय बळावला. पोलीस खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींनी दाखवलेल्या जामनगरमधील दरेड येथील कारखान्यात पोलिसांनी फॉरेन्सिक टीमच्या उपस्थितीत उत्खनन सुरू केले. १५ फूट खोल खड्ड्यातून मानवी सांगाडा आणि अवशेष बाहेर काढण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पृथ्वी आणि तिचा प्रियकर निलेश कचेटिया या दोघांविरुद्ध हत्येचा आणि पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. जप्त करण्यात आलेल्या मानवी अवशेषांची डीएनए आणि वैज्ञानिक तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT