Vaishno Devi landslide file photo
राष्ट्रीय

Vaishno Devi landslide: जम्मू-काश्मीरमध्ये जलप्रलय! वैष्णोदेवी मंदिराजवळ भूस्खलन; ३० जणांचा मृत्यू

Jammu Kashmir floods : जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले असून, वैष्णोदेवी मंदिराजवळ भीषण भूस्खलन झाले आहे.

मोहन कारंडे

Jammu Kashmir floods Vaishno Devi landslide

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले असून, वैष्णोदेवी मंदिराजवळ झालेल्या भीषण भूस्खलनात किमान ३० जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर प्रशासनाने वैष्णोदेवी यात्रा पुढील सूचना मिळेपर्यंत थांबवली आहे. याशिवाय, काश्मीर खोऱ्यातही मुसळधार पाऊस आणि पुरामुळे पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे.

याआधी १४ ऑगस्ट रोजी किश्तवाड जिल्ह्यातील मचेल माता मंदिराच्या मार्गावरील शेवटचे गाव असलेल्या चिसोती येथे ढगफुटीमुळे आलेल्या पुरात ६५ जणांचा मृत्यू झाला होता, ज्यात बहुतांश भाविक होते. तर १०० हून अधिक जण जखमी झाले होते.

यात्रा मार्गावर दरड कोसळली

रियासी जिल्ह्याचे एसएसपी परमवीर सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, कटरा येथील वैष्णोदेवी मंदिराजवळ मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात ३० जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास वैष्णोदेवी गुंफा मंदिराच्या मार्गावरील अर्धकुवारी येथील इंद्रप्रस्थ भोजनालयाजवळ ही दरड कोसळली. या घटनेनंतर प्रशासनाने भाविकांची वाहतूक पूर्णपणे थांबवली आहे.

२२ रेल्वे गाड्या रद्द, २७ गाड्यांचा मार्ग बदलला

प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उत्तर रेल्वेने २२ गाड्या रद्द केल्या असून २७ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. कटरा, जम्मू व उधमपूर स्थानकांवर थांबणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या. तसेच पठाणकोट ते कंडरोरीदरम्यानही चक्की नदीवरील पुरामुळे रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.

मुख्यमंत्री अब्दुल्ला यांची गृहमंत्री शाह यांच्याशी चर्चा

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करून राज्यातील परिस्थितीची माहिती दिली. "जम्मू विभागात सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून दूरध्वनी व इंटरनेट सेवा खंडित झाली आहे. मी सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून असून उद्या सकाळी जम्मूमध्ये जाणार आहे," असे अब्दुल्ला यांनी सांगितले.

३,५०० नागरिक सुरक्षितस्थळी हलवले

दरम्यान, प्रशासनाने आतापर्यंत ३,५०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवून मदत छावण्यांमध्ये ठेवले आहे. मुठी आणि सतवारी येथील सामुदायिक स्वयंपाकघरांमधून जेवणाची सोय केली जात आहे. सर्व प्रमुख मदत केंद्रांवर वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. जम्मूचे उपायुक्त राकेश मिन्हास यांनी सांगितले की, वीज, पाणीपुरवठा पूर्ववत करणे आणि महामार्गांवरील ढिगारे हटवणे याला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT