Jammu Kashmir special session
जम्मू-काश्मीर : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनात दहशतवादी हल्ल्याच्या निषेधाचा प्रस्ताव मांडला जाणार आहे. त्याचबरोबर हल्ल्यानंतर केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेच्या समर्थनार्थ एकमताने ठराव मंजूर केला जाऊ शकतो.
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पहलगाम हल्ल्यानंतर उपराज्यपाल मनोज सिन्हा यांना विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची विनंती केली होती. उपराज्यपाल सिन्हा यांनी ही विनंती मान्य करत आज २८ एप्रिल रोजी विशेष अधिवेशन बोलावण्यास मान्यता दिली. सकाळी १०:३० वाजता अधिवेशनाला सुरूवात होणार आहे.
विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे म्हणणे आहे की हे अधिवेशन दहशतवादाविरुद्ध विशेष असेल. जम्मू विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुनील शर्मा म्हणाले की, "सर्वपक्षीय बैठकीत दहशतवादाविरुद्ध सर्वांनी एकता दाखवली. केंद्राच्या दहशतवादाबाबतच्या निर्णयांना सर्वांनी पाठिंबा दिला. विधानसभेच्या अलिकडच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपण अनेक लढाया लढल्या आहेत. २८ एप्रिल रोजी बोलावलेले विधानसभेचे अधिवेशन हे विशेष अधिवेशन आहे. सीमेवर तणाव आहे, लोकांच्या मनात भीती आहे, हल्ल्यात २६ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, हा शोककाळ आहे. सर्वांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे."