विधानसभा निवडणुकीनंतर जम्मू-काश्मीरमध्ये सत्ता कोणाची येईल, याची उत्सुकता लागली आहे.  Pudhari News Network
राष्ट्रीय

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक: सत्तेची दारे सर्वांसाठी खुली

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल १० वर्षांनी विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. २०१४ नंतर जम्मू-काश्मीरमध्ये आता निवडणुका होत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने १८ आणि २५ सप्टेंबर, १ ऑक्टोंबर अशा तीन टप्प्यांत विधानसभा निवडणुका घेण्याचे जाहीर केले. तर निकाल ४ ऑक्टोबर रोजी लागणार आहे. विधानसभेत सत्ता स्थापनेसाठी भाजप, काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांसह नॅशनल कॉन्फरन्स, पीपल्स डेमोक्रॅटीक पक्ष (पीडीपी) या प्रादेशिक पक्षांनी कंबर कसली आहे. यासोबतच अनेक छोटे पक्षही निवडणुकीच्या आखाड्यात असतील. निवडणुकीनंतर जम्मू-काश्मीरमध्ये सत्ता कोणाची येईल, याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. सध्यातरी सत्तेची दारे सर्वांसाठी खुली असल्याचे चित्र जम्मू-काश्मीरमध्ये आहे. (Jammu Kashmir Assembly Elections)

जम्मू-काश्मीरमध्ये २०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाने आघाडी तोडून वेगळे वेगळे लढण्याचा निर्णय घेतला होता. तसेच केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपने मोठे यश मिळवले होते. त्यामुळे त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसला. यामुळे भाजपला तब्बल २५ जागांवर विजय मिळवता आला. पीपल्स डेमोक्रॅटीक पक्षाला (पीडीपी) २८ जागांवर यश मिळाले. तर काँग्रेस १२ आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाला १५ जागांवर विजय मिळवता आला. परिणामी भाजप आणि पीडीपी यांनी एकत्र येऊन सरकारची स्थापना केली. पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती यांची मुख्यमंत्री पदी निवड करण्यात आली. (Jammu Kashmir Assembly Elections)

जम्मूमध्ये काँग्रेस, भाजपचे वर्चस्व

यानंतर केंद्र सरकारने कलम ३७० रद्द केले, जम्मू-काश्मीरपासून लडाख केंद्रशासित प्रदेश निर्माण केला. या निर्णयामुळे जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय, सामाजिक समीकरणे बदलली आहेत. यंदा होत असलेल्या निवडणुकीत ९० जागा आहेत. यापैकी काश्मीर घाटीमध्ये ४७ विधानसभा आणि जम्मूमध्ये ४३ विधानसभा आहेत. काश्मीर घाटीमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी या दोन्ही प्रादेशिक पक्षांसह इतर छोट्या पक्षांचे वर्चस्व आहे. या दोन पक्षांपैकी ज्याने काश्मीरमध्ये बाजी मारली तो पक्ष वरचढ ठरेल. जम्मू भागातील विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांचे वर्चस्व आहे. जम्मूमध्ये या दोन्ही पक्षांमध्ये जो वरचढ ठरेल, त्याला सत्ता स्थापना सोपी जाईल. (Jammu Kashmir Assembly Elections)

काँग्रेसच्या आघाडीची ताकद वाढली

या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स या दोन्ही पक्षांनी आघाडी जाहीर केली आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपही झाले असून ५१ जागा नॅशनल कॉन्फरन्स आणि ३२ जागांवर काँग्रेस लढणार आहे. या दोन पक्षांनी सीपीआयएम आणि पँथर पक्षालाही सोबत घेऊन प्रत्येकी एक जागा दिली आहे. तर ५ जागांवर काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्समध्ये मैत्रीपूर्ण लढत असेल. यामुळे २०१४ च्या तुलनेत काँग्रेसच्या आघाडीची ताकद वाढली आहे. दुसरीकडे मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपी आणि भाजपने ‘अकेला चलो’चा नारा दिला आहे. या निवडणुकीत गुलाम नबी आझाद यांचा डेमोक्रॅटिक प्रोग्रेसीव्ह आझाद पक्ष, राशीद इंजिनियर यांचा जम्मू-काश्मीर अवामी इत्तेहाद पक्ष स्वबळावर लढत आहेत. या दोन्ही पक्षांचा फायदा भाजपला होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Jammu Kashmir Assembly Elections)

या निवडणुकीत भाजप ३७० हटवून कसा विकास केला, याचा प्रचार करत आहे. तर जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा देणार असल्याचा प्रचार काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सची आघाडी करत आहे. मेहबूबा मुफ्ती यांच्या पक्षाने पूर्वीच्या धोरणावर चालण्याचे ठरवले आहे. त्यामुळे सध्यातरी जम्मू-काश्मीरमध्ये सत्तेची दारे सर्वांसाठी खुली असल्याचे चित्र आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT