Kishtwar Cloudburst
जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात शुक्रवारी मचैल माता यात्रा मार्गावर ढगफुटी झाली होती. यातील मृतांचा आकडा ६५ वर पोहोचला आहे. त्यात दोन सीआयएसएफ जवानांचा समावेश आहे तर सुमारे १०० जखमी झाले आहेत. येथे दुसऱ्या दिवशीही एनडीआरएफ तसेच राज्याच्या आपत्ती निवारण पथकांकडून बचावकार्य सुरूच आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री ओमर अब्दुला आणि नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांना फोन करुन परिस्थितीची माहिती घेतली. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.
हिमालयातील माता चंडीच्या मंदिराकडे जाणाऱ्या मचैल माता यात्रा मार्गावर अचानक आलेल्या पुरामुळे शेकडो लोक बेपत्ता आहेत. तर अनेकजण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
ही ढगफुटीची घटना चसौती गावाजवळ घडली. या गावाजवळ भाविक मोठ्या संख्येने मचैल माता यात्रेला जाण्यासाठी जमले होते. तिथून मंदिरापर्यंत ८.५ किमी पायी चालत जावे लागते. चसौती हे गाव ९,५०० फूट उंचीवर आहे. ते किश्तवाडपासून सुमारे ९० किमी अंतरावर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १६७ जणांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले आहे. यातील ३८ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. अचानक आलेल्या पुरामुळे यात्रेसाठी उभारण्यात आलेली सामुदायिक स्वयंपाकाची व्यवस्था (लंगर) आणि एका सुरक्षा चौकीचे नुकसान झाले आहे.
येथे बचाव आणि शोध मोहीम सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
''मला नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन आला होता. मी त्यांना किश्तवाडमधील सध्याच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली. आमचे सरकार आणि या ढगफुटीच्या घटनेमुळे त्रस्त झालेले लोक त्यांनी दिलेल्या आधाराबद्दल आणि केंद्र सरकारने दिलेल्या मदतीबद्दल आभारी आहे, असे ओमर अब्दुला यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. मी आज दुपारी किश्तवाला रवाना होणार आहे. ढगफुटीच्या दुर्घटनेच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करणार आहे. मी तेथील बचाव कार्याचा आढावा घेईन आणि आणखी कोणत्या प्रकारच्या मदतीची आवश्यकता आहे याचे मूल्यांकन करणार असल्याचे अब्दुला यांनी म्हटले आहे.