

नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात मानवतेच्या संग्रामामध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ एक जाज्वल्य उदाहरण म्हणून इतिहासात नोंदले जाईल, असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले आहेत. 79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी राष्ट्राला संबोधित केले. यावेळी त्यांनी संविधान आणि लोकशाही आपल्या सर्वांसाठी सर्वोच्च असल्याचे प्रतिपादनही केले.
राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, यावर्षी देशाला दहशतवादाचा प्रहार सोसावा लागला. काश्मीरमध्ये फिरायला गेलेल्या निष्पाप नागरिकांची हत्या अतिशय भ्याड आणि अत्यंत अमानुष होती. भारताने पोलादी संकल्पासह निर्णायक पद्धतीने याला प्रत्युत्तर दिले. ऑपरेशन सिंदूरने दाखवून दिले की, जेव्हा राष्ट्राच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहतो, तेव्हा आपली सैन्यदले कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी संपूर्ण समर्थ असतात. आपण केलेल्या कारवाईचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आपली एकता हेच होते.
भारताची भूमिका मांडण्यासाठी विविध देशांमध्ये गेलेल्या खासदारांच्या बहुपक्षीय प्रतिनिधी मंडळांमध्ये हीच एकता दिसून आली. जागतिक समुदायाने त्यामुळेच भारताची विशेष दखल घेतली. भारत स्वतःहून कधीच आक्रमक होणार नाही. मात्र, आपल्या नागरिकांच्या रक्षणासाठी प्रत्युत्तराची कारवाई करण्यात तीळमात्र कुचराईही करणार नाही, असे राष्ट्रपती म्हणाल्या.
राष्ट्रपती म्हणाल्या की, संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भर भारत अभियानाची परीक्षाही ऑपरेशन सिंदूरच्या वेळी पाहिली गेली. आपण योग्य मार्गावर आहोत हे आता सिद्ध झाले आहे. आपल्या संरक्षणविषयक बहुतांश गरजा भागवण्यात आपण आत्मनिर्भर झालो आहोत. या यशामुळे स्वतंत्र भारताच्या संरक्षण इतिहासात एक नवा अध्याय गुंफला गेला आहे.
राष्ट्रपती म्हणाल्या, भारत जगातील सर्वात जुन्या प्रजासत्ताकाची भूमी असल्याने भारताला लोकशाहीची जननी म्हणणे सर्वतोपरी योग्य आहे. संविधानात समाविष्ट असलेल्या न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता ही चार मूल्ये म्हणजे लोकशाहीचे मजबूत स्तंभ आहेत.