Pahalgam Tourism : २२ एप्रिल २०२५ हा दिवस जम्मू-काश्मीरमधील पर्यटकांसाठी काळा दिवस ठरला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. धर्म विचारुन अंदाधूंद गोळ्या झाडल्या. संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवत दहशतवादाला खतपाणी घालणार्या पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तरही दिले. आता देशभरातील पर्यटकांनी पहलगामला भेट देत 'आम्ही भ्याड दहशतवादी हल्ल्यांना भीक घालत नाही', असा संदेशच दिला आहे. जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पहलगाम शहर पुन्हा "पर्यटकांच्या वर्दळीने गजबजून गेले" असल्याची 'एक्स' पोस्ट केली आहे.
महिन्याभरातील आपल्या दुसऱ्या पहलगाम दौऱ्यावर असलेल्या ओमर अब्दुल्ला यांनी गजबजलेले रस्ते आणि वाहतूक कोंडीची छायाचित्रे शेअर केली आहेत. त्यांनी 'एक्स' पोस्टमध्ये म्हटलं आहे की, मी काही दिवसांपूर्वी पहलगामला आलो होता. तेव्हा तेथील बाजारपेठ जवळजवळ ओसाड होती. मी तिथून सायकल चालवत गेलो होतो. आज परत आलो असता पहलगाम पर्यटकांनी गजबजलेले दिसले. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले पर्यटक, येथील आल्हाददायक हवामान आणि पावसाळी वातावरणाचा आनंद लुटणाऱ्या स्थानिक नागरिकांशी जागेसाठी स्पर्धा करत होते. मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांना हळूहळू यश मिळत असल्याचे पाहून खूप समाधान वाटते."
पहलगाममधील बैसरन खोर्यात २२ एप्रिल २०२५ रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात २५ पर्यटक आणि एका स्थानिकाचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील पर्यटन उद्योगावर मोठा परिणाम होणार, असा अंदाज व्यक्त केला जात होता. यानंतर पर्यटकांमध्ये आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या मंत्रिमंडळाने राजधानी श्रीनगरबाहेर, पहलगाममध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती. मात्र दहशतवादी हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी काश्मीरमधून काढता पाय घेतल्याने सरकारने अनेक पर्यटन स्थळे बंद केली होती. मे महिन्यात हॉटेल्समधील ८०% बुकिंग रद्द झाल्याचे वृत्त होते.
जम्मू-काश्मीरमधील बंद करण्यात आलेल्या ४८ पैकी १६ पर्यटन स्थळे पुन्हा सुरू केली आहे. "पृथ्वीवरील स्वर्ग" अशी ओळख असणार्या काश्मीरमध्ये पर्यटनाला पुन्हा एकदा चालना मिळताना दिसत आहे. पर्यटन उद्योग हा जम्मू-काश्मीर राज्याची जीवनरेखा आहे. जम्मू आणि काश्मीरच्या एकूण जीडीपीमध्ये (GDP) याचा वाटा सुमारे ७-८ टक्के आहे. विशेषतः काश्मीर खोऱ्यासाठी हे प्रमाण आणखी जास्त आहे.