मध्य प्रदेशातील उपविभागीय अधिकार्‍यासह १० पोलीस निलंबित (Pudhari Photo)
राष्ट्रीय

MP Hawala Money Case | जालन्याला हवालामार्गे जाणारे १ कोटी ४५ लाख पोलिसांनीच लुटले: मध्य प्रदेशातील उपविभागीय अधिकार्‍यासह १० पोलीस निलंबित

Jalna News | वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू

पुढारी वृत्तसेवा

MP police suspended

भोपाळ : मध्य प्रदेशातून जालन्याला पाठवली जाणारी 1.45 कोटी रुपयांची हवालाची रक्कम लुटल्याप्रकरणी मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा पांडे यांच्यासह 10 पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. पोलिसांनी रक्‍कम जप्‍त न करता आपआपसांतच वाटून घेतल्याच्या धक्‍कादायक प्रकाराची मध्य प्रदेश सरकारने गंभीर दखल घेतली आहे.

ही घटना बुधवार (दि.8 ऑक्टोबर) च्या रात्रीची आहे. कटनी येथून क्रेटा कारमधून (एमएच 13/ इके 3430) तीन कोटी रूपये रोख जालना येथे जात असल्याची माहिती सिवनी पोलिसांना मिळाली होती. उपविभागीय अधिकारी पांडे यांनी बंडोल पोलिस ठाण्याशी संपर्क साधून गाडी अडविण्यास सांगितले.त्यानुसार रात्री दीड वाजता पोलिसांनी कार रोखली. त्या कारमधील रोख रक्‍कम चालकाला दमदाटी करून पोलिसांच्या गाडीत टाकण्यात आली.

9 ऑक्टोबर रोजी हवाला व्यापारी सोहन परमार यांनी पांडे यांची भेट घेतली. तडजोडीअंती दीड कोटी रक्‍कम परत करण्याचे ठरले. त्यानुसार परमार यांनी रक्‍कम देण्यात आली. परंतु कारने पोलिस ठाणे सोडल्यानंतर परमार यांनी रक्‍कम मोजली असता त्यात 25 ते 30 लाख कमी असल्याचे आढळले. संतप्‍त परमार यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि गोंधळ घातला. यावेळी त्यांच्यासोबत आणखी एक व्यापारी होती. या प्रकाराची माहिती स्थानिक पत्रकारांना कळाल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतल्यानंतर खरा प्रकार उजेडात आला.

पोलिस महानिरीक्षक (जबलपूर) प्रमोद वर्मा यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. त्यांच्या अहवालाआधारे मध्य प्रदेशचे पोलिस महासंचालक कैलाश मकवाना यांनी पांडे यांना निलंबित केले आहे.

सिवनीचे पोलिस अधीक्षक सुनील कुमार मेहता यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री तपासणीदरम्यान बंडोल पोलिस ठाण्याचे प्रभारी आणि एसडीओपी कार्यालयातील कर्मचारी यांना सिलादेही जंगलात एक चारचाकी वाहनात मोठ्या प्रमाणात रोकड सापडली. ही रक्कम जालना येथे नेली जात होती. मात्र, ही रोकड जप्त करण्याऐवजी त्यांनी वाहनचालकाला मारहाण करून पळवून लावले आणि रक्कम हडप करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या रकमेबाबत वरिष्ठांनाही माहिती दिली नाही. या घटनेचा तपास जबलपूरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक आयुष गुप्ता यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत 1कोटी 45 लाख जप्‍त केले आहेत. ही रक्‍कम जालन्यात कोणाकडे जात होती याचा तपासही सुरू असल्याचे कळते.

बंडोल पोलिस ठाण्याचे प्रभारी उपनिरीक्षक अर्पित भैराम, हेड कॉन्स्टेबल मखन आणि रवींद्र उइके, कॉन्स्टेबल जगदीश यादव, योगेंद्र चौरसिया, रितेश (चालक), नीरज राजपूत, केदार आणि सदाफल अशी अन्य निलंबित कर्मचार्‍यांची नावे आहेत. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्रकरण दाबण्याचा प्रयत्न

दुसरीकडे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सोमवारी तपासाच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलिस अधिकारी सिवनी येथे होते. तेव्हा त्यांच्यासमोर पांडे यांनी जबाब दिला. मादक द्रव्याची तस्करी केली जात असल्याचे कळाल्यानंतर पोलिसांनी धाड टाकल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणात प्राथमिक चौकशी अंती पोलिसांवर प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे, असे सूत्रांनी सांगितले. या लूट प्रकरणाचा तपास जबलपूर गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT