शहागड : पुढारी वृत्तसेवा
अबंड तालुक्यातील बारासवडा पाटीजवळ राष्ट्रीय महामार्ग 52 वर रॉग साईडने भरधाव वेगात आलेल्या हायवा ट्रकने समोरून येणाऱ्या कारला जोराची धडक दिली. या अपघातात परराज्यातील पती-पत्नी जागीच ठार झाले. तर पाचजण गंभीर जखमी झाले. ही घटना (रविवार) मध्यरात्री 11:30 वाजता धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बारसवाडा पाटीजवळ घडली.
हैदराबाद येथील कुटुंब देवदर्शनासाठी शिर्डीला जात असतांना कॅरेन्स गाडी क्र. टी. जी. 08 क्यू 0558 या कारने हैदराबाद हून 5 जण रविवारी दुपारी १२ वाजता शिर्डीकडे निघाले होते. यावेळी धुळे-सोलापूर महामार्गावरील बारसवाडा फाट्याजवळ राँग साईडणे येणाऱ्या विना नंबरच्या भरधाव हायवा ट्रकची आणि कारची समोरासमोर जोराची धडक झाली. या धडकेत परराज्यातील पती-पत्नी जागीच ठार झाले असून, कारमधील पाचजण गंभीर जखमी झाले आहेत.
हा अपघात एवढा भीषण होता की जेसीबीच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आले. हैदराबादहून शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी जात असताना भाविकांवर काळाचा घाला आला. अपघातात जी.रामू वय 42 वर्ष , जी. माधुरी वय 39 वर्ष दोघे. रा. हैद्राबाद जागीच ठार झाले असून, श्रीवाणी 40 वर्ष, अनुषा 16 वर्ष , मेघना 11 वर्ष, ऋषिका 7 वर्ष, नागेश्वर राव 45 वर्ष हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हा अपघात होताच घटनास्थळी स्थानिकांनी येऊन मदत कार्य सुरू केले. हा अपघात एवढा भीषण होता की, कारमधील मृतदेह व जखमींना जेसीबीद्वारे बाहेर काढण्यात आले. या घटनेची माहिती कळताच घटनास्थळी महामार्ग 52 ची 1033 रुग्णवाहिका मदत केली. गंभीर जखमींना रुग्णवाहिकने छत्रपती संभाजी नगरातील खासगी दवाखान्यात हलवले.
पत्नीचे घाटी येथे शवविच्छेदन सोमवारी सकाळी झाले, तर पतीचे शवविच्छेदन पाचोड उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी दुपारी वैद्यकीय अधिकार्यांनी केले. उपनिरीक्षक किरण हावले, पो.कॉ. दिपक भोजने अधिकचा तपास करीत असून अपघात होताच हायवा चालक फरार झाला आहे.