भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आज (२४ ऑगस्ट) मॉस्को येथे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. 
राष्ट्रीय

Jaishankar Russia visit : जयशंकर यांनी मॉस्कोमध्ये घेतली रशियन अध्यक्ष पुतिन यांची भेट, BRICS पूर्वी मोठी घडामोड!

द्विपक्षीय संबंधांसह जागतिक घडामोडींवर चर्चा, PM मोदींचा संदेश केला सुपूर्द

पुढारी वृत्तसेवा

Jaishankar Putin Moscow Meeting : भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आज (२४ ऑगस्ट) मॉस्को येथे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छा आणि एक वैयक्तिक संदेश पुतिन यांच्याकडे सुपूर्द केला. दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आलेल्या जयशंकर यांनी अध्यक्ष पुतिन यांच्याशी द्विपक्षीय संबंध आणि जागतिक घडामोडींवर सविस्तर चर्चा केली. दरम्‍यान, सप्टेंबरमध्ये नवी दिल्लीत होणाऱ्या 'ब्रिक्स' (BRICS) शिखर परिषदेसाठी पुतिन भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

PM मोदी एससीओ आणि ब्रिक्स परिषदेत पुतिन यांच्या भेटीसाठी उत्सुक

बैठकीदरम्यान जयशंकर म्हणाले की, भारत आणि रशियादरम्यान व्यापार, ऊर्जा, खते आणि अणुऊर्जा क्षेत्रातील आर्थिक सहकार्य मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. तसेच, दोन्ही देशांमधील 'आंतरसरकारी आयोगा'च्या बैठकीतील निर्णयांची माहिती त्यांनी पुतिन यांना दिली."पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) परिषदेत आपली भेट घेण्यास तसेच ब्रिक्स परिषदेसाठी आपले भारतात स्वागत करण्यास उत्सुक आहेत. त्यानंतर आपल्या सोयीनुसार वार्षिक द्विपक्षीय शिखर परिषदही पार पडेल," असे जयशंकर यांनी स्पष्ट केले.

द्विपक्षीय आर्थिक संबंध अधिक मजबूत करण्यावर भर

याआधी, जयशंकर यांनी रशियाचे उपपंतप्रधान डेनिस मान्तुरोव्ह यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. "गुंतागुंतीच्या जागतिक परिस्थितीमध्येही भारत-रशिया भागीदारीने आपले अस्तित्व आणि लवचिकता सिद्ध केली आहे," असे मत जयशंकर यांनी या वेळी व्यक्त केले. रशिया दौऱ्यात जयशंकर रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांचीही भेट घेणार असून, प्रादेशिक व जागतिक मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. जुलेमध्ये मनिला येथे झालेल्या बैठकीनंतर महिनाभरातच ही भेट होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT