India energy security | भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांशी साधला ३ वेळा संवाद  
राष्ट्रीय

India energy security | भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांशी साधला ३ वेळा संवाद

इराणमधील भारतीयांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न – परराष्ट्र मंत्रालय

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताच्या ऊर्जा सुरक्षेसह इराणमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत सरकार सतर्क आहे. पश्चिम आशियातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदेत दिली. ऊर्जा पुरवठा, समुद्री सुरक्षा आणि परदेशातील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत भारत सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केले.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी गेल्या काही दिवसांत इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरघची यांच्याशी दूरध्वनीवर तीन वेळा चर्चा केली आहे. या चर्चेदरम्यान समुद्री जहाजांच्या सुरक्षेबाबत तसेच भारताच्या ऊर्जा सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाली. जयशंकर आणि अराघची यांच्यात झालेल्या अलीकडील चर्चेतही या विषयांवर विचारविनिमय झाला असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या संदर्भात सध्या अधिक तपशील देणे घाईचे ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

पश्चिम आशियातील संघर्षामुळे महत्त्वाच्या होर्मुझच्या सामुद्रधूनीमधून होणाऱ्या जहाज वाहतुकीबाबत विचारले असता जैस्वाल म्हणाले की, या विषयावर भारत आणि इराण यांच्यात संवाद सुरू आहे आणि परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. इराणमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबतही भारत सरकार सतर्क असल्याचे त्यांनी सांगितले. उपलब्ध माहितीनुसार इराणमध्ये सुमारे ९ हजार भारतीय नागरिक आहेत.

त्यामध्ये विद्यार्थी, समुद्री कर्मचारी, व्यावसायिक तसेच काही धार्मिक यात्रेकरूंचा समावेश आहे. संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तेहरानसह काही भागांमध्ये असलेल्या भारतीयांना खबरदारी म्हणून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. तसेच भारतात परतू इच्छिणाऱ्या नागरिकांना मदत करण्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात येत आहे. काही भारतीय नागरिकांनी अझरबैजान आणि अर्मेनियामार्गे भारतात परतण्याचा पर्याय निवडला असून त्यांना व्हिसा मिळवून देणे आणि सीमा ओलांडण्यासाठी आवश्यक समन्वय साधण्यात भारत सरकार मदत करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT