S. Jaishankar
नवी दिल्ली : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अफगाणिस्तानचे कार्यवाहू परराष्ट्र मंत्री मवलावी अमीर खान मुत्ताकी यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. तालिबान सरकारच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केल्याबद्दल जयशंकर यांनी त्यांचे आभार मानले. ‘एक्स’वर पोस्ट करुन त्यांनी याबद्दल माहिती दिली.
भारताच्या क्षेपणास्त्रांनी अफगाणिस्तानला लक्ष्य केल्याचा पाकिस्तानचा आरोप तालिबान सरकारच्या मंत्र्यांनी फेटाळून लावला. याबद्दलही जयशंकर यांनी अफगाण सरकारचे आभार मानले. भारत आणि अफगाणिस्तानातील तालिबान सरकार यांच्यातील ही पहिली मंत्रीस्तरीय खुली चर्चा होती. जयशंकर म्हणाले की, भारत आणि अफगाणिस्तानमधील जुन्या मैत्रीपूर्ण संबंधांचा पुनरुच्चार करण्यात आला आणि भविष्यात ते कसे पुढे न्यायचे यावर चर्चा झाली.
दरम्यान, भारताने तालिबान सरकारला अद्याप अधिकृतपणे मान्यता दिलेली नाही. मात्र, वेळोवेळी भारताने अफगाणिस्तानला मदत केली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, तालिबानने मुंबईतील अफगाण वाणिज्य दूतावासात आपल्या राजदूताची नियुक्ती केली.