Jaipur theft case file photo
राष्ट्रीय

Viral News: "कपडे फाडेन अन् पोलिसात अडकवेन..." चोरी करताना रंगेहात पकडल्यानंतर महिलेची घरमालकालाच धमकी, व्हिडिओ व्हायरल

घरात घुसून दागिन्यांची चोरी करताना रंगेहात पकडल्या गेलेल्या एका महिलेने घरमालकालाच थेट पोलिसांची धमकी दिल्याची घटना जयपूरमध्ये उघडकीस आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Jaipur theft case

जयपूर: घरात घुसून दागिन्यांची चोरी करताना रंगेहात पकडल्या गेलेल्या एका महिलेने घरमालकालाच थेट पोलिसांची धमकी दिल्याची घटना जयपूरमध्ये उघडकीस आली आहे. घरातून पळ काढता येत नसल्याचे लक्षात येताच, या महिलेने स्वतःचे कपडे फाडण्याची आणि घरमालकाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ घरमालकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला असून, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

सीसीटीव्ही फुटेजमुळे चोरी उघड

जयपूरच्या मुहाना परिसरातील एका घरात काही दिवसांपूर्वी दागिने आणि रोकड चोरीला गेली होती. या घटनेनंतर सतर्क झालेल्या घरमालकाने सुरक्षेचा उपाय म्हणून घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. गुरुवारी घरमालक आपल्या कुटुंबासह बाहेर गेला असताना, त्याने मोबाईलवर घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी एक अनोळखी महिला बेडरूममध्ये शिरून कपाट उघडताना दिसली. तिने कपाटातील दागिन्यांचा डबा काढून त्यातील मौल्यवान ऐवज चोरल्याचे सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत होते.

मुख्य गेट केले बंद; चोरटी महिला जाळ्यात अडकली

चोरीचा हा प्रकार लाईव्ह पाहताच घरमालकाने तात्काळ आपल्या शेजाऱ्याला फोन केला आणि घराचे मुख्य गेट बाहेरून लॉक करण्यास सांगितले. यानंतर घरमालकही तातडीने घराच्या दिशेने निघाला. गेट बंद असल्याने चोरी करून पळण्याच्या प्रयत्नात असलेली महिला घरातच अडकून पडली.

'कपडे फाडून पोलिसांत अडकवेन'

घरमालक आणि शेजारी समोर येताच घाबरण्याऐवजी या महिलेने उलट त्यांच्यावरच आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. स्वतःचा बचाव करण्यासाठी तिने घरमालकालाच धमकावण्यास सुरुवात केली. "मी स्वतःचे कपडे फाडून घेईन, मग पोलीस येऊन तुम्हालाच पकडतील," अशी धमकी ती महिला घरमालकाला देताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. घरमालकाने या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ धाव घेतली. संबंधित महिलेला ताब्यात घेतले असून घरमालकाच्या तक्रारीवरून आणि सीसीटीव्ही फुटेज व व्हिडिओच्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT